वळवली येथे जुन्याच जीर्ण टाकीच्या भरोवशावर जलजीवन योजना
| अलिबाग | प्रतिनिधी |
जलजीवन योजनेमध्ये जुन्याच जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीचा आधार ठेकेदार घेत असल्याचा आरोप वळवली येथील महिलांनी केला आहे. मंगळवारी या महिला आपल्या न्याय्य हक्कासाठी एकवटल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांची भेट घेऊन नवीन पाण्याची टाकी बांधण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन बास्टेवाड यांनी दिले. बेलोशी ग्रामपंचायत हद्दीतील वळवली येथे 230 घरांची वस्ती आहे. या गावाची लोकसंख्या 900हून अधिक आहे. आदिवासीवाडी येथे 20 वर्षे जुन्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांद्वारे उमटे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. गावातील जुन्या टाक्या जीर्ण झाल्याने त्यांची वारंवार डागडुजी करावी लागत आहे.
गावासाठी जलजीवन योजना मंजूर झाली आहे. सुमारे 97 लाख रुपयांची ही योजना आहे. या योजनेमार्फत गावातील नागरिकांना मिळणारे पाणी जुन्या टाकीद्वारेच दिले जाणार आहे. या टाक्या नादुरुस्त होण्याच्या धोका कायमच संभवत आहे.
जीर्ण झालेल्या टाकीचे छत कमकुवत झाल्याने अपघात होण्याचा धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या टाकीद्वारे पाणीपुरवठा करण्यापेक्षा नवीन टाकी बांधण्यात यावी, अशी मागणी वळवली येथील महिलांनी केली आहे.
मंगळवारी 19 डिसेेंबर रोजी सर्व महिलांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांची भेट घेतली. जलजीवन मिशन योजनेत असलेल्या त्रुटीबाबत त्यांनी माहिती दिली. ठेकेदाराकडून ग्रामस्थांनी अपूर्ण माहिती देऊन योजनेचे काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी डॉ. बास्टेवाड यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील उपअभियंता यांच्याशी संपर्क साधला. हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
ग्रामस्थांना विश्वासात न घेता योजना सुरु
वळवली गावासाठी जलजीवन योजना मंजूर झाली आहे. या योजनेसाठी नेमलेल्या ठेकेदाराने ग्रामस्थांना व गावातील पाणीपुरवठा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना अपूर्ण माहिती दिली. त्यानंतर त्याने कामाला सुरुवात केली. त्यामुळे ग्रामस्थ व महिलांमध्ये या योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ठेकेदाराने महिला मंडळ, समिती व ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम सुरु केल्याचा आरोप महिला मंडळ व ग्रामस्थ मंडळांनी निवेदनाद्वारे केला आहे.
जीर्ण झालेल्या टाक्यांवर रंगरंगोटी
रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी मुबलक पाणीपुरवठा मिळावा यासाठी जलजीवन मिशन योजना सुरु करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून या योजनेचे काम गावागावात सुरु करण्यात आले आहे. हे काम पारदर्शक व्हावे यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी स्वतः तालुकास्तरावर बैठक घेऊन योजनेबाबत असलेले प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र आजही जुन्याच जीर्ण झालेल्या विहिरी, पाण्याच्या टाक्यांचाआधार घेत योजना राबविली जात आहे. या जीर्ण झालेल्या टाक्यांना रंगरंगोटी करून नवीन टाकी करण्याचा प्रयत्न काही ठेकेदार करीत असल्याच्या तक्रारी जिल्ह्यात वाढू लागल्या आहेत.
नियमात खोदकाम करण्यास टाळाटाळ
जलजीवन मिशनचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून युध्दपातळीवर सुरु आहे. पाण्याच्या टाकीपर्यंत पाईप टाकताना ते तीन फूट खोल खोदणे अपेक्षित असताना, काही ठेकेदार सहा इंच ते एक फूट खोल खोदकाम करीत आहेत. त्यामुळे हे कामदेखील पारदर्शक होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या प्रश्नांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.