रायगडात महिला, मुली असुरक्षित!

अत्याचार, अपहरण ,विनयभंगाचे 393 गुन्हे ; 375 गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश

| रायगड | प्रतिनिधी |

महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही दुय्यमच आहे. त्या घरात आणि बाहेरही सुरक्षित नसल्याचे गेल्या वर्षीच्या महिला संदर्भातील गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून दिसत आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचार, अपहरण आणि विनयभंगाचे 393 गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांपैकी 375 गुन्हे उघड करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. अद्यापही 18 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांनी यश आलेले नाही.

जिल्ह्यात महिलांच्या विनयभंगाचे 152 गुन्हे दाखल झाले. यातील 149 गुन्हे उघड झाले. महिला अत्याचाराचे 100 गुन्हे दाखल करण्यात आले. यातील 100 गुन्हे उघड झाले. महिलांचे अपहरणाचे 141 गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. यापैकी 126 अपहरणाचे गुन्हे उघड झाले आहेत. महिला अत्याचाराचे गुन्हे गतवर्षीपेक्षा कमी झाले असले तरी विनयभंगाचे गुन्हे गतवर्षीपेक्षा 39 ने वाढले आहेत. अपहरणाचे गुन्हे गतवर्षीपेक्षा 14 ने वाढले आहेत.

समाज आधुनिक होत आहे, तितकेच महिलांवरील अत्याचारही वाढत असल्याचे या घटनांवरून दिसत आहे. हे वाढते अत्याचार समाजासाठी चिंतेची बाब ठरत आहे. महिलांवर शारीरिक, मानसिक आणि भावनिक अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार, विनयभंग, हुंडाबळी, सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या, या घटना सातत्याने घडत आहे. दुर्दैवाने मोठ्या शहरात घटना घडली तर त्या विरोधात आवाज उठवला जातो, अंतर ग्रामीण भागात अशा घटना अनेकदा पोलीस ठाण्यांपर्यंतही पोहोचत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात जवळचे नातेवाईक, परिचायतील व्यक्तीचा सहभाग अधिक आढळून आला आहे. अल्पवयीन मुलींच्या बाबतीतही हाच प्रकार घडत आहे.

Exit mobile version