संचिकेसाठी महिला सात वर्षांपासून प्रतिक्षेत

सिडको प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी

| अलिबाग | प्रतिनिधी |

गावठाण विस्तारासाठी संपादीत केलेल्या भुखंडाची संचिका मिळावी यासाठी गेल्या सात वर्षांपासून महिला चपला झिजवत आहेत. मात्र, सिडको प्रशासनाकडून अद्यापही ती संचिका देण्यात आली नाही, असा आरोप एका महिलेने केला आहे. एका बाजूला महिलांचा सन्मान करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजनांचा वर्षाव करीत आहे. तर, दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडून संचिकेसाठी महिलेला वाट पहावी लागत आहे, ही चिंतेची बाब असल्याचे समोर आले आहे.

उरण तालुक्यातील चिरनेर येथील कमल अरुण मुंबईकर यांचे वडील बाळकृष्ण भोईर यांची सिडकोने गावठाण विस्तारासाठी जमीन संपादीत केली होती. त्याची फाईल तयार करून संचिका के. 66 सिडकोला देण्यात आली होती. ती संचिका वारस म्हणून मिळावी यासाठी कमल मुंबईकर यांनी सिडकोकडे मागणी केली होती. त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती घेतली. त्यावेळी भुखंडाची संचिका गहाळ झाल्याचे माहितीच्या अधिकारात सिद्ध झाले. याबाबत राज्याचे माहिती आयुक्तांकडे अर्ज करण्यात आले. त्यांनी तातडीने दखल घेत संचिकेतील कागदपत्रे शोधून द्या अन्यथा संचिका गहाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करू. तसेच, अहवाल 15 दिवसांत सादर करण्याचे माहिती आयोगाने आदेश दिले होते. संचिका मिळावी यासाठी गेली अनेक वर्षे कमळ मुंबईकर सिडकोच्या कार्यालयात चपला झिजवत आहेत. परंतु, ती संचिका अजूनपर्यत त्यांना मिळाली नाही. संचिका गहाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा देखील करण्यास दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मुंबईकर यांनी केला आहे. याबाबत अनेक वेळा कार्यालयासमोर उपोषणासह लढा दिला आहे. परंतु, या महिलेला न्याय देण्यास सिडको प्रशासन उदासीन ठरल्याचे बोलले जात आहे.

या पिडीत महिलेला न्यायासाठी सात वर्षांपासून लढा द्यावा लागत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. याकडे सरकार गांभीर्याने लक्ष देईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संचिकेबाबतच्या मागणीची पाहणी करून घेतली जाणार आहे. या विषयाची शहानिशा करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको
Exit mobile version