| अलिबाग | प्रतिनिधी |
ज्येष्ठ नागरिक संस्था अलिबागने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यावर्षी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात महिला नगरसेविका व नगराध्यक्षा निवडून आल्यामुळे अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान संस्थेतर्फे करण्यात आला.
यावेळी अवयवदान मोहिमेत व अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेतर्फे मोलाचे कार्य करणाऱ्या निर्मला फुलगावकर यांचाही सन्मान संस्थेतर्फे करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संस्था अलिबागची त्रैमासिक संपर्क सभा (दि.8) मार्च रोजी क्रीडा भवन अलिबागच्या नाना नानी पार्कमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केली होती. यावेळी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांचे यांचे सामाजिक सांस्कृतिक व राजकीय जडणघडणीत महिलांचे स्थान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेचे कार्यकर्ते नितीन राऊत यांनी मरणोत्तर देहदान व अवयवदान या विषयावर माहिती दिली.
अलिबाग नगरपालिकेत निवडून आलेल्या नवनिर्वाचित तरुण नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, संध्या पालवणकर, सुषमा पाटील, डॉ. साक्षी पाटील, ॲड. श्वेता पालकर, ॲड. निवेदिता वाघमारे, अश्विनी ठोसर, प्रा. नीलम हजारे, योजना पाटील, वृषाली भगत यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संस्थेतील ज्या सभासदांचे वय 90 वर्षे 80 वर्षे व 75 वर्षे पूर्ण झालेले आहेत अशा ज्येष्ठ सभासदांचा सन्मान करुन त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू तळकर व शरद कोरडे यांनी केले. कार्यक्रमास प्रणिता वर्तक, मेघना कुलकर्णी, आर. के. घरत, शिल्पा नाईक, दिलीप शिंदे, सुरेखा कोलते, मंगला सावंत, मिलिंद सुळे, मनोहर सुर्वे, सतीश वर्तक, शरद कोरडे व उदय जोशी यांनी विशेष मेहनत घेतली होती. उपाध्यक्षा चारुशीला शरद कोरडे यांनी सर्व उपस्थितांचे, मान्यवरांचे आभार मानून सभेचा समारोप केला.







