17 पैकी 9 जागा महिलांसाठी आरक्षित
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव नगरपंचायतीच्या 2021 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाले असून पुन्हा एकदा नगरपंचायतीवर महिला राज आला असून 17 पैकी 9 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या असून या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे पत्ते कट झाल्याने ते नाराज झाले आहेत.
रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडील आदेशाने माणगाव तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांच्या नियंत्रणाखाली व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.15) सकाळी 11:30 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय भवन तहसील कार्यालय माणगाव येथे माणगाव नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या नामाप्र आरक्षणाच्या फेर सोडतीकरीता सुधारित आरक्षण व सोडतिचा कार्यक्रम घेण्यात आला. या आरक्षण व सोडतीकरिता माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, राजिपचे माजी सभापती ज्ञानदेव पवार, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, संदीप खरंगटे, दिलीप जाधव, मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे, माणगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष महामूद धुंदवारे, जेष्ठ नेते राजाभाऊ जाधव, माजी नगरसेवक सचिन बोंबले, नितीन वाढवळ, माजी स्वीकृत नगरसेवक हेमंत शेट, आदींसह नगरपंचायत हद्दीतील विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
माणगाव नगरपंचायतीचा एकूण 17 वार्डांपैकी वार्ड क्र.1 अनुसूचित जमाती महिला,वार्ड क्र.2 अनुसूचित जाती महिला,वार्ड क्र.11 अनुसूचित जाती सर्वसाधारण हे राखीव ठेवण्यात आले. तर वार्ड क्र.6 नामाप्र महिला,वार्ड क्र.8 नामाप्र महिला, वार्ड क्र.14 नामाप्र सर्वसाधारण,वार्ड क्र.17 नामाप्र सर्वसाधारण हे आरक्षण चिट्ठी काढून आरक्षित करण्यात आले. तर वार्ड क्र.4 सर्वसाधारण महिला, वार्ड क्र.7 सर्वसाधारण महिला,वार्ड क्र.9 सर्वसाधारण महिला, वार्ड क्र.10 सर्वसाधारण महिला, वार्ड क्र.13 सर्वसाधारण महिला हे वार्ड मागील वेळेस महिलांसाठी राखीव नसल्याने यावेळेस महिलांसाठी आरक्षित घोषित करण्यात आले. तसेच उर्वरित वार्ड क्र.3 सर्वसाधारण खुला, वार्ड क्र.5 सर्वसाधारण खुला, वार्ड क्र.12 सर्वसाधारण खुला, वार्ड क्र.15 सर्वसाधारण खुला, वार्ड क्र.16 सर्वसाधारण खुला आरक्षित घोषित करण्यात आले.य ा आरक्षणामुळे गेली वर्षभरापासून इच्छुक असलेल्या अनेकांचे पत्ते कट झाले आहेत.त्यामुळे माणगाव नगरपंचायत हद्दीत कही ख़ुशी कही गम हि परिस्थिती निर्माण झाली आहे.