दिव्यांगासह महिला बचत गटांना मिळणार लाभ

फिरत्या ई-रिक्षाने व्यवसायाला गती; रायगड जि.प.चा पुढाकार

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांगासह महिला बचत गटांना व्यवसायाच्या माध्यमातून उभारी देण्याचा प्रयत्न रायगड जिल्हा परिषदेने केले आहे. गेल्या तीन वर्षांपासून असलेला अखर्चित निधी दिव्यांगासह महिला बचत गटांना स्वयंरोजगारासाठी खर्च केला जाणार आहे. त्यांना अद्ययावत अशा सर्व सोयी सुविधांयुक्त ई-रिक्षा टेम्पो शंभर टक्के अनुदानातून दिला जाणार आहे.

रायगड जिल्ह्यात 17 हजारांहून अधिक दिव्यांग असून, दोन हजारांहून अधिक महिलांचे वेगवेगळे बचतगट गावपातळीवर तयार झाले आहेत. वाढते, नागरीकरण, पर्यटन व औद्योगिकीकरणातून दिव्यांग व महिला बचत गटांना स्वयंरोजगाराचे साधन खुले करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. दिव्यांगांसह महिला बचत गटांंसाठी फिरते ई-रिक्षा टेम्पो शंभर टक्के अनुदानातून दिले जाणार आहे. 70 हून अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी साडेचार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. तालुकास्तरावर सोडत पद्धतीने ई-रिक्षाचे वितरण केले जाणार आहे.

जिल्हा परिषदेकडून देण्यात येणाऱ्या ई-रिक्षा टेम्पोमार्फत दिव्यांग तसेच महिला बचतगट त्यांच्या आवडीचा व्यवसाय करू शकतात. भाजीपाला विक्रीसह अन्य किराणा माल विक्रीचे स्टॉल उभारता येणार आहेत. त्या टेम्पोतील माल सुरक्षित ठेवण्यासाठी पत्र्याचा खोका तयार करण्यात आला आहे.

रिक्षाचा गैरवापर झाल्यास करणार जमा
दिव्यांगांसह महिला बचतगटांना रोजगाराचे साधन खुले व्हावे यासाठी ई-रिक्षा टेम्पो वितरीत केले जाणार आहेत. त्यांना व्यवसाय उभे करण्यासाठी या वस्तू जिल्हा परिषदेेकडून देण्यात येणार आहेत. मात्र, या ई-रिक्षा टेम्पोचा गैरवापर म्हणजे प्रवासी सेवेबरोबरच विकण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांच्याकडून त्या जमा केल्या जातील, असा इशारा डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिला आहे.
Exit mobile version