महिलांनी पर्यटन व्यवसायातून विकास साधावा

चौलमळा येथे उज्वला बानखेळे यांचे मार्गदर्शन

| चौल | प्रतिनिधी |

पर्यटन हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र असून, त्यामुळे महिलांचा या क्षेत्रातील वाढता सहभाग त्यांच्या आर्थिक विकासाकरिता एक चांगले साधन ठरु शकते. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. याचा फायदा घेऊन महिलांना पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून आपली आर्थिक उन्नती साधावी, असे मार्गदर्शन कृषी अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बानखेळे यांनी केले. चौलमळा येथे महिला किसान दिन कार्यक्रमाच्या वेळी त्या बोलत होत्या.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था (आत्मा) व कृषक कल्याणकारी संस्था चौल यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील चौलमळा गावच्या कृष्णादेवी मंदिरात नुकतेच महिला किसान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उज्वला बानखेळे यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखडे, कृषक कल्याणकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील, अध्यक्ष प्रमोद पाटील, चौलमळा गावचे उपाध्यक्ष जितेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केले. त्यानंतर कृषी अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बानखेळे यांनी आपल्या मार्गदर्शनात उपस्थित ग्रामस्थ व महिलांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, कृषी उत्पादने, प्रक्रिया उद्योगातील संधी, रायगड जिल्ह्यात बचत गटामार्फत चाललेले कार्य याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच महिला शेतकरी गटांना जिल्ह्यात वाढणाऱ्या पर्यटनाच्या व्यावसायिक संधी याविषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखडे यांनी कृषी विभागाच्या योजनांबाबत मार्गर्शन केले.

यावेळी रवींद्र पाटील यांनी महिलांसाठी संस्थेमार्फत मधुमक्षिका पालन व मत्स्यपालन याविषयी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांनी, तर आभार प्रदर्शन प्रमिता पाटील यांनी केले.

Exit mobile version