महिलांनी संघटित होऊन विकास साधावा, दर्शना पाटील यांचे प्रतिपादन

न्हावे येथे महिला बचत गटांना मार्गदर्शन

| अलिबाग | प्रतिनिधी |
सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशस्वी भरारी घेत आहेत. महिलांनी संघटित होऊन आपला विकास साधावा याकरिता महिला बचत गट ही संकल्पना उदयास आली. ही संकल्पना नुसतीच उदयास आलेली नाही, तर त्यातून अनेक महिलांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करीत अनेक महिलांचे आयुष्य घडविले आहे. त्याच धर्तीवर महिलांनी संघटित होऊन आपला विकास साधावा, असे प्रतिपादन दर्शना पाटील यांनी केले.

त्या पुढे म्हणाल्या की, शेतकरी कामगार पक्ष आणि महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील स्वतः दुर्गम भागातील महिलांना स्वयंरोजगाराकरिता प्रेरित करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे आज हजारो महिला स्वतःच्या पायावर उभ्या असून, स्वाभिमानाने जीवन जगत आहेत.ग्रुप ग्रामपंचायत न्हावे येथे महिला बचतगटांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी एनआरएलएमचे सीसी राठोड सरांनी सर्व महिलांना बचतगटांसाठी असणार्‍या शासकीय योजना समजावून सांगितल्या.

ग्रामसंघ स्थापन केल्यावर आणखी योजनांचा लाभ बचतगटांना कसा घेता येतो, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. कृषीवलचे व्यवस्थापक आणि शेकाप कार्यकर्ते रुपेश पाटील तसेच कृषीवलच्या दर्शना पाटील यांनी महिलांना संघटित होऊन विकास साधावा, असे सांगितले. महिला बचतगटांना विविध सरकारी योजना आहेत. परंतु, आपल्या महिला त्याचा लाभ घेत नाहीत, ही खंत न्हाव्याच्या सरपंच, तसेच इतर ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या गावातील महिला बचत गटांच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे अश्‍वासन दिले.

यावेळी आरडीसीसी बँकेचे चणेरा शाखेचे व्यवस्थापक अतुल नागावकर यांनीही उपस्थित महिलांना बँकेचे सर्व सहकार्य करू, असे सांगितले. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत न्हावे सरपंच राजश्री महादेव शहबाजकर, ग्रामसेवक दीपक वारगे, सदस्य गोविंद भायतांडेल, मनोज भायतांडेल, कार्यकर्ते विकास भायतांडेल, पोलीस पाटील मंगेश नारायण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.या सभेमध्ये प्रभात ग्रामसंघाची स्थापना करून अध्यक्ष सचिव खजिनदार लेखापाल यांची निवड करण्यात आली. न्हावे गावच्या ग्रामसेवकांनी महिलांना विविध छोट्या उद्योगांविषयी माहिती देऊन सहकार्य करण्याचे अश्‍वासन दिले.

Exit mobile version