। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलीकडच्या काळात लाडकी बहीण योजना सुरु केली, महिलांच्या खात्यात पैसे दिले. परंतु, दुसरीकडे लसणासह अन्य पदार्थांच्या किमती भरमसाठ वाढविल्या आहेत. शिंदे सरकार लूटमार करणारे व फसवणारे सरकार आहे. निवडणूक जवळ आल्यावर त्यांना लाडक्या बहिणींची आठवण झाली. बदलापूर, उरणसारख्या घटना होत असताना महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे महिलांनी महागाईविरोधात आणि सुरक्षेसाठी एकजूट होण्याची गरज आहे, असे आवाहन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले.
रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशन पुरस्कृत लेक शिवबाची अंतर्गत भव्य संवाद महिला मेळावा गुरुवारी (दि.14) किहीम येथील प्रांगणात आयोजित करण्यात आला. यावेळी पाटील बोलत होत्या. यावेळी रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा तथा अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या उपाध्यक्षा तथा अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका वृषाली ठोसर, शेकाप राज्य विद्यार्थी संघटना अध्यक्षा साम्या कोरडे, शेकाप तालुका महिला आघाडी उपाध्यक्षा रोशनी मोकल, सुकन्या साखरकर आदी मान्यवर, पदाधिकारी, शेकाप महिला आघाडीच्या पदाधिकारी, सभासद, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
याप्रसंगी चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, महिलाच समाजाचे परिवर्तन करू शकते. महिलाच समाजाला पुढे नेऊ शकते. त्यासाठी महिलांना एकत्र केले पाहिजे. त्यांना चांगले विचार दिले पाहिजेत. त्यांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजेत. ही भूमिका शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांची आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून ‘लेक शिवबा’ची हा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यातून महिलांना एकत्र आणून विचारांचे आदान-प्रदान करण्याचे काम सुरू केले आहे. महिलांकडून मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा आनंद आहे. शेतकरी कामगार पक्ष कायमच शेतकरी, कष्टकरी, गोरगरीबाला केंद्रबिंदू ठेवून काम करीत आला आहे. कोरोना काळात शेकापच्या माध्यमातून मदतीचा हात दिला. मुलींना शिक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून त्यांच्यासाठी मोफत सायकल देऊन बांधिलकी जपण्याचे काम केले. अलिबाग मुंबईच्या अगदी जवळ आहे. अलिबागला पर्यटनातून चालना मिळावी यासाठी शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने मांडवा जेट्टीचे अस्तित्व निर्माण केले. पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी कायमच प्रयत्न केले जात आहे.
स्व. मीनाक्षी पाटील यांनी राज्यमंत्री असताना तालुक्यासह जिल्हा, राज्यासाठी काम केले आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या विभागातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मांडव्यामधून खूप पर्यटक येतात. स्थानिकांना रोजगार मिळावा, ही अपेक्षा आहे. या विभागासाठी स्थानिक माणूस मोठा होईल याकडे लक्ष दिले जाईल. पाण्याचा प्रश्न अनेक गावांत गंभीर आहे. एक संधी दिल्यास येथील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन चित्रलेखा पाटील यांनी दिले.