खारघरमध्ये भरदिवसा महिलांची बॅग हिसकावली

। पनवेल । प्रतिनिधी ।

खारघरमध्ये भरदिवसा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रिक्षातून प्रवास करणाऱ्या दोन महिलांची बॅग दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात लुटारूंनी हिसकावून नेल्याची घटना खारघर सेक्टर 19 येथे घडली. या बॅगेमध्ये रोख रक्कम, पैठणी साडी आणि मेकअप साहित्य असा एकूण सुमारे 1 लाख 23 हजार रुपयांचा ऐवज होता.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला खारघर परिसरात राहणाऱ्या असून त्या दुसऱ्या महिलेसोबत रिक्षाने सीवूड्स येथे जात होत्या. याचदरम्यान खारघर सेक्टर 19 येथे दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या जवळील बॅग हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिलांमध्ये घबराट निर्माण झाली. या घटनेनंतर महिलांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन अज्ञात लुटारूंविरोधात गुन्हा नोंदवला असून, त्यांचा शोध सुरू केला आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे खारघर परिसरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

Exit mobile version