| पनवेल | वार्ताहर |
खारघरमध्ये चेन स्नॅचींग आणि मोबाईल चोरी करणार्या लुटारुंचा सुळसुळाट वाढला असून, या लुटारुंनी खारघरमध्ये राहणार्या पोलीस कर्मचार्याच्या पत्नीच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन खेचल्याचे उघडकीस आले आहे. तर दुसर्या घटनेतील लुटारुने जीएसटी विभागातील महिला अधिकार्याचा महागडा मोबाईल फोन लुटून पोबारा केला आहे. खारघर पोलिसांनी या दोन्ही घटनांमधील लुटारुंविरोधात जबरी चोरीचे गुन्हे दाखल केला आहे.
खारघरमधील बेलपाडा येथे घडलेल्या चेन स्नॅचींगच्या घटनेतील 48 वर्षीय तक्रारदार महिला खारघर सेक्टर-3 मध्ये राहण्यास आहेत. या महिलेचे पती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या महिला नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेल्या होत्या. मॉर्निंग वॉक करुन त्या 7.45 वाजण्याच्या सुमारास घरी पायी चालत जात होत्या. यावेळी पाठीमागून मोटारसायकलवरुन हेल्मेट परिधान केलेल्या लुटारुने या महिलेच्या गळ्यातील एक तोळे वजनाची 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन खेचून पलायन केले. यावेळी या महिलेने आरडा-ओरड केली. मात्र, तो पर्यंत सदर लुटारु मोटारसायकलवरून पसार झाला. त्यानंतर या महिलेने सदर घटनेची माहिती आपल्या पतीला दिल्यानंतर खारघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तर खारघर, सेक्टर-23 मध्ये घडलेल्या दुसर्या घटनेत खारघर, सेक्टर-20 मध्ये राहणार्या 37 वर्षीय जीएसटी विभागातील महिला कर निरीक्षक या सेंट्रल पार्क जवळ वॉकींगसाठी गेल्या होत्या. यावेळी पाठीमागून मोटारसायकलवरुन हेल्मेट घालून आलेल्या अज्ञात लुटारुने त्यांच्या हातातील 80 हजार रुपये किंमतीचा आयफोन-16 प्रो मोबाईल फोन हिसकावून गुरुद्वाराच्या दिशेने पलायन केले. या महिलेने त्याच्या मागे पळत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, लुटारु मोटारसायकलवरुन पसार झाला. त्यानंतर त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.