कालावधीत वाढ करण्याची मागणी
। रायगड । प्रतिनिधी ।
पावसाळ्यातील मासेमारीबंदीच्या कालावधीमध्ये 15 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात यावी, अशी मच्छीमारांची मागणी असून या मच्छीमारांच्या मागणीची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. मत्स्यव्यवसाय विभागाकडून आगामी मासेमारीबंदीच्या कालावधीसंदर्भात नुकतेच आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार 1 जून ते 31 जुलै (दोन्ही दिवस धरून) असा मासेमारीबंदीचा कालावधी आहे. या कालावधीत वाढ न झाल्याने मच्छीमारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
समुद्रातील मासळीच्या साठ्यात मुबलक वाढ व्हावी, यासाठी मासेमारीबंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात यावा, अशी मच्छीमारांची भूमिका आहे. यासंदर्भात एप्रिलमध्ये मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन कालावधी वाढविण्याबाबत विनंती केली होती. गुजरातमध्येही मच्छीमारांनी हीच भूमिका घेत कालावधी वाढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुजरातमध्ये हा कालावधी 15 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्रातही बंदीचा कालावधी वाढविण्यात येईल, अशी मच्छीमारांची अपेक्षा व्यक्त केली होती, मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे. मासेमारीबंदीच्या आदेशानुसार बंदीचा कालावधी 1 जून ते 31 जुलैएवढाच आहे. आपल्या मागणीचा विचार न झाल्याने मच्छीमारांमध्ये नाराजी आहे.
राज्याच्या सागरी क्षेत्रात (सागरी किनार्यापासून 12 सागरी मैलापर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांसाठी ही बंदी लागू करण्यात आली आहे. ही बंदी ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणार्या बिगर यांत्रिक मासेमारी नौकांना लागू असणार नाही. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका या 1 जूनपूर्वी मासेमारी बंदरात परत येणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे 31 जुलै व त्यापूर्वी समुद्रात मासेमारीकरिता जाता येणार नाही. सागरीकिनार्यापासून 12 सागरी मैलापुढे खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणार्या नौकांना केंद्र सरकारच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण, मार्गदर्शक सूचना व आदेश लागू राहतील.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई
राज्य सरकार आदेशानुसार 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत जवळपास दोन महिन्याच्या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी करण्यात आली आहे. मासेमारी बंदी कालावधीला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्या मच्छिमारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाकडून सांगण्यात आले आहे. सर्व मच्छीमारी सहकारी संस्था, त्यांचे नौकामालक, सभासद व अन्य संबंधितांनी बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.