| पनवेल | वार्ताहर |
तळोजा परिसरात वाहनांमधील तसेच स्टील सळ्यांचा मुद्देमाल परस्पर अफरातफर करून चोरी करणार्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यामधील प्रमुख आरोपी इम्तियाज शेखसह नऊ जणांवर तळोजा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तळोजा एमआयडीसी परिसरात घडली. याप्रकरणी ओमप्रकाश चौधरी, मैफूज अहमद खान, निजाम अली, रुद्रप्रसाद चौधरी, जलाउद्दीन खान, संतोष कुलबुल गौतम, माशूक अली अन्सारी, मोहम्मद अली, इम्तियाज, सरफराज हजरत व दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठे स्टील मार्केट म्हणून कळंबोली स्टील मार्केट परिसराकडे पाहिले जाते. या परिसरात अनेक प्रकारचे गुन्हे वारंवार घडत आहेत. वाहनचोरी, गोडाऊनमधून मुद्देमाल चोरणे तसेच अवजड वाहनांतील स्टील लोखंडी सळ्या कॉइल यांसारखा मुद्देमाल परस्पर रातोरात चोरून काळाबाजार करण्याचे प्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत. तळोजा एमआयडीसी परिसरातील रतन मोटर कंपनीसमोर तळोजातील पोलीस कर्मचारी गुन्हे प्रकटीकरण पथकामध्ये कार्यरत असलेले गुरुनाथ भुंडेरे हे परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तळोजातील रतन मोटर कंपनीच्या परिसरात वाहनांमधील लोखंडी सळ्या मुद्देमालाचा अपहार करून एका वाहनातून दुसर्या वाहनांमध्ये या सळ्या भरल्या जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता हा संपूर्ण प्रकार उघड झाला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मराठे पोलीस हवालदार धीरज पाटील, खैरनार, पोलीस नाईक शिंदे, पोलीस शिपाई म्हस्के, पोलीस शिपाई जाधव यांच्या पथकाने परिसरात जाऊन रंगेहात पकडले. या संपूर्ण प्रकाराची चौकशी केल्यानंतर अशी निदर्शनास आले की, या ठिकाणी अजून भरलेल्या सळ्यांच्या गाड्या येऊन उभे राहत आहेत. या सुरू असलेल्या प्रकाराबाबत पोलिसांनी संपूर्ण चौकशी केली असता या मुद्देमालाचे कोणते कागदपत्र आढळून आले नाहीत.