। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत येथे तहसील कार्यालय ब्रिटिश काळानंतर असलेल्या टेकडीवरून प्रशासकीय भवनात आले. मात्र, दुय्यम निबंधक कार्यालय हे टेकडीवर होते. तब्बल सव्वा वर्षानंतर दुय्यम निबंधक कार्यालय टेकडी येथील तहसील कार्यालयातून प्रशासकीय भवन येथे आणले आहे.
जुन्या तहसील कार्यालयाच्या कचेरी भागात असलेले दुय्यम निबंधक कार्यालय हे नवीन प्रशासकीय भवनमध्ये आले नव्हते. गेली अनेक महिने जमीन खरेदी-विक्री होणारे कार्यालय टेकडी खाली आणावे अशी सातत्याने मागणी होत होती. पोलीस मित्र संघटनेचे रमेश कदम यांनी त्यासाठी उपोषण देखील केले होते. अखेर दुय्यम निबंधक कार्यालय कर्जत टेकडी येथून प्रशासकीय भवन येथे आणण्यात आले आहे. नवीन प्रशासकीय भवनाच्या तळमजल्यावर दुय्यम निबंधक कार्यालयसाठी जागा देण्यात आली आहे. त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते झाले. त्यावेळी तालुक्याचे तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, पोलीस उप अधीक्षक डी. डी. टेले तसेच, दुय्यम निबंधक कर्जत एक या कार्यालयाचे प्रमुख सुमती सामंत आदी प्रमुख उपस्थित होते.