प्रकाशदूतांचे तळा शहर, ग्रामीण विभागाकडून कौतुक
। तळा । वार्ताहर ।
कळमशेत, भानंग कासेखोल येथील वीजवाहिनींच्या तारा तुटल्याने गावे, वाड्या-वस्त्यांवरील ग्राहकांची वीज खंडीत झाली. मात्र, भर पावसात महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी जंगलातील चिखल तुडवत अनेक धोके पत्करत रात्रभर वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम केले. त्यामुळे अनेक गावे व वाड्यावस्त्यांचा वीजपुरवठा सुरळीत झाला.
सोमवारी कासेखोल येथील जंगलात वादळी वार्यासह मुसळधार पावसामुळे चार खांबावरील तारा तुटल्याचे आढळले. विजेच्या तारा तुटलेल्या ठिकाणी जाणे धोक्याचे होते. तर जंगलातील निसरड्या चिखलामुळे चालणेही कठीण झाले होते. महावितरण शाखेचे अभियंता, घेवारे, कनिष्ठ अभियंता पाटील, यांनी स्वप्नील शिंदे, मोरे, पंडित, अमोल सकपाळ, मुंडे, निहार, शिगवण, आदेश कुरक, सचिन या 10 तंत्रज्ञांसह तारांचे दुरुस्तीचे काम रात्रीच करण्याचा निर्णय घेतला. भर पावसात जंगलातून चालत मोबाइल बॅटरीच्या उजेडात तुटलेल्या तारा जोडण्याचे काम सुरू केले. तुटलेल्या तारा जोडण्याचे 100% टक्के पूर्ण झाल्यानंतर किरकोळ दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरू झाला.
तत्पर ग्राहकसेवेसाठी प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीशी झुंज देत वीजपुरवठा सुरळीत करणार्या प्रकाशदूतांचे तळा शहर आणि ग्रामीण विभागाकडून कौतुक होत आहे.