मंडणगड नगरपंचायतीत महिला वर्चस्वाची चाहूल

सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर
यानुसार अनेक प्रभाग महिलांसाठी राखीव
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
मंडणगड नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीनंतर, आस्थापनेवर महिला वर्चस्व असण्याची चाहूल लागत आहे. कारण, कोव्हिड-19च्या पार्श्‍वभूमीवर लांबलेल्या मंडणगड नगरपंचातीच्या सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडत नुकताच काढण्यात आली असून, यामध्ये सर्वाधिक प्रभाग महिलांसाठी राखीव झाले आहेत. यामुळे विविध उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे आढळत आहे.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात खेड प्रातांधिकारी भाग्यक्षी मोरे, तहसिलदार दत्तात्रेय बेर्डे, मुख्याधिकारी विनोद डौले यांनी शहरातील नागरीक व पत्रकार यांच्या उपस्थितीत मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ओ.बी.सी. आरक्षणाच्या संदर्भातील निर्णय व सन 2011 च्या जनगणनेनुसार ही आरक्षण सोडत काढण्यात आली. मंडणगड नगरपंचायतीमधील 17 जागांसाठी ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 17 पैकी तब्बल 9 जागा, अनुसुचीत जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षीत ठेवून हे प्रभाग चिठ्ठीद्वारे निवडण्यात आले.
सोडत कार्यक्रमात सौरभ शिंदे व सोहम सापटे या दोन लहान मुलांचे हस्ते चिठ्या काढण्यात आल्या. गत नगरपंचायत निवडणुकीत निवडुन आलेल्या अनेक प्रस्थापित नगर सेवकांचे प्रभाग महिलांकरिता आरक्षीत झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला. नगरपंचायतीने राबविलेल्या सोडतीचे कार्यक्रमास नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी अभिजीत राणे, मनोज मर्चंडे, विकास साळवी, रविंकुमार शिंदे, नितेश लेंढे, संदीप डीके, किरण साखरे, गणेश सापटे, मोहन तलार, व ग्रामस्थ उपस्थित होते.
नगरपंचायत कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक; 1,2,8,12,15,17 हे 6 प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले. प्रभाग क्रमांक 3 व 9 हे 2 प्रभाग नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव प्रवर्गाकरिता राखीव झाले. प्रभाग क्रमांक 4,5,10,11,13,16 हे 6 प्रभाग सर्वसाधारण खुल्या प्रवर्गाकरिता राखीव झाले आहेत. प्रभाग क्रमांक 6,7 हे 2 प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग खुल्या प्रवर्गाकरिता राखीव झाले. प्रभाग क्रमांक 14 हा 1 प्रभाग अनुसुचीत जाती महिला प्रवर्गाकरिता राखीव झाला आहे.

Exit mobile version