| माथेरान | प्रतिनिधी |
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचालींना सुरवात झाली असून आता नगराध्यक्ष आरक्षणानंतर महिला आरक्षण आणि सोडत कार्यक्रम करण्यात आला. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आरक्षणाकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते. त्यानुसार मंगळवारी (दि.7) नगरपरिषदेच्या स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात प्रभागांचे आरक्षण व सोडत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आरक्षण आणि सोडत पीठासीन अधिकारी प्रांत कर्जतचे प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सोडत पद्धतीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्याच्या जागा यांचे संरक्षण संबंधित अधिनियम निश्चित करण्यात आले. सोडतीच्या वेळेस प्रारूप प्रभाग रचनेचा नकाशा व त्याच्या चतुरसीमा दर्शनी ठिकाणी लावण्यात आली. या प्रसंगी माथेरान अधीक्षक तथा तहसीलदार सुरेंद्र सिंह ठाकूर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी पीठासीन अधिकारी कर्जत प्रांत प्रकाश संकपाळ यांच्या आदेशानुसार आरक्षण सोडत सुरू केली. इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या मीरा आखाडे या लहान विद्यार्थीनीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली.
प्रभाग निहाय आरक्षण
प्रभाग 1 ‘अ' नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व ‘ब' सर्वसाधारण, प्रभाग 2 ‘अ' नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व ‘ब' सर्वसाधारण, प्रभाग 3 ‘अ' नागरिकांचा मागास प्रवर्ग व ‘ब' सर्वसाधारण महिला, प्रभाग 4 ‘अ' अनुसूचित जाती व ‘ब' सर्वसाधारण महिला, प्रभाग 5 ‘अ' अनुसूचित जाती महिला व ‘ब' सर्वसाधारण, प्रभाग 6 ‘अ' अनुसूचित जाती महिला व ‘ब' सर्वसाधारण, प्रभाग 7 ‘अ' अनुसूचित जमाती महिला व ‘ब' सर्वसाधारण, प्रभाग 8 ‘अ' नागरिकांचा मागास प्रवर्ग व ‘ब' सर्वसाधारण महिला, प्रभाग 9 ‘अ' सर्वसाधारण महिला व ‘ब' सर्वसाधारण, प्रभाग 10 ‘अ' नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व ‘ब' सर्वसाधारण.







