पोलीस ठाण्यात महिला सहाय्यता कक्ष

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल हद्दीसह नवी मुंबईतील प्रत्येक पोलिस ठाण्यात महिलांना भेडसावणार्‍या तक्रारीचे निरसन करण्यासाठी महिला सहाय्यता कक्ष सुरु करण्याचा निर्णय नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासह त्यांच्या समस्यांचे निरसन होण्यास मदत मिळणार असल्याने पोलीस आयुक्तांच्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.

पनवेल परिसरासह नवी मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये महिला सहायता कक्ष सुरू झाले असून, महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 1 व परिमंडळ 2 या परिमंडळ विभागामध्ये यापूर्वीच महिला सुरक्षा पेट्रोलींग सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात येत असते. सदरच्या पेट्रोलींग मोबाईलकडून सार्वजनिक ठिकाणावर महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पेट्रोलींग केली जाते, तसेच नियंत्रण कक्षाकडून महिलाविषयक प्राप्त तक्रारीस त्वरित व संदेवनशीलपणे प्रतिसाद दिला जातो. त्याचप्रमाणे महिला सुरक्षेसंदर्भात पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी तत्परता दाखवत महिला सहाय्यता कक्ष प्रत्येक पोलीस ठाण्यात सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सहायता कक्ष सुरु झाले असल्याने महिलांची होणारी धावपळ थांबण्यास मदत मिळणार आहे.

Exit mobile version