पाण्यासाठी महिलांचे ग्रामपंचायतीला निवेदन

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या आषाणे गावात स्थानिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाली-भुतिवली लघुपाटबंधारे धरणाच्या परिसरात असलेल्या आषाणे गावातील बोअरवेलचे पाणी मार्च महिन्यात कमी होते. दरम्यान, शासनाने नळपाणी योजनेचे काम वेळेत पूर्ण व्हावे आणि गावामध्ये ट्रँकरने पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी स्थानिकांनी, महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली.

उमरोली ग्रामपंचायतमधील आषाणे गावात 70 घरांची वस्ती असून उमरोली ग्रामपंचायतसाठी जलजीवन मिशनमधून नळपाणी योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून राबविण्यात असलेल्या या योजनेचे काम पूर्ण होऊन नळाद्वारे पाणी पोहचण्यास किमान वर्षे लागणार आहे. मात्र, आषाणे गावामध्ये असलेल्या जुनी नळपाणी योजना अनेक वर्षापासून बंद आहे. तर पाली-भुतिवली धरणाच्या खालील बाजूला असलेल्या आषाणे गावामध्ये सर्व ग्रामस्थांनी बोअरवेल खोदून पाण्याचा उपसा करण्यास सुरुवात केली. मात्र, या भागातील पाण्याचा प्रवाह मार्च महिन्यात आटतो. त्यामुळे आषाणे गावात पाण्याची टंचाई भासू लागते. त्यामुळे महिलांची पायपीट मार्च महिना सुरू होताच सुरू झाली आहे, तर शेतकर्‍यांची जनावरे ही मोकाट सोडण्यात आली आहेत.

गावात निर्माण झालेली पाणीटंचाई आणि दरवर्षी निर्माण होणारी पाणी टंचाईबद्दल ग्रामपंचायतकडून पाण्याची व्यवस्था उमरोली ग्रामपंचायतकडून करण्यात यावी आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मदत व्हावी यासाठी आषाणे ग्रामस्थ आणि महिला सोमवारी (दि. 4) ग्रामपंचायत कार्यालयात धडकल्या. यावेळी मनोज ठाणगे, वैशाली ठाणगे, वासंती श्रीखंडे, मथुरा धुंदा श्रीखंडे, ताई परशुराम श्रीखंडे, गीता गणेश श्रीखंडे, दीपा ठाणगे, रूपा ठाणगे, गौरी जाधव, विमल जांभुळकर, अनिता ठाणगे तसेच, आदिवासी महिला उपस्थित होत्या.

Exit mobile version