महिलांची एकजूट क्रांती घडवेल- चित्रलेखा पाटील

। अलिबाग । प्रतिनिधी ।

निवडणुकीत तरुणांसह घरातील प्रमुख मंडळींना दारुच्या आहारी घालविण्याचा प्रकार घडतो. त्याचा नाहक त्रास आई, पत्नी, मुलगी व मुलांना होतो. दारुमुळे कुटुंबं उद्ध्वस्त होतात. दारुचे व्यसन लावून चिखलात लोळवणार्‍यांना महिलाच त्यांची जागा दाखविणार आहेत. पाणी, रस्त्याचा प्रश्‍न गंभीर आहे. पण, ठेकेदाराकडून टक्केवारी घेऊन आपली झोळी भरण्याचे काम आमदार करतात, असा आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केला. हे आपल्याला थांबवायचे असून, पुढचा आमदार कोण असणार हे महिलाच ठरविणार आहेत. महिलांची एकजूट एक वेगळी क्रांती घडविणार, असा विश्‍वासही चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.

रायगड जिल्हा महिला बचतगट फेडरेशन पुरस्कृत ‘लेक शिवबा’ची अंतर्गत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महिला संवाद मेळाव्याचे आयोजन सहाण बायपास येथील पांडुरंग मानकर यांच्या श्रीगणेश मंगल कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी (दि.27) करण्यात आले. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या.
यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका तथा रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या उपाध्यक्षा वृषाली ठोसर, संजना कीर, पंचायत समितीच्या माजी सदस्या अश्‍लेषा नाईक, आक्षीच्या सरपंच रश्मी पाटील, शेकाप कामगार राज्य समितीचे प्रमुख प्रदीप नाईक, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, सौंदर्या पोईलकर, विद्या मगर, लहानी नाईक, रेखा मगर, पूनम वर्तक आदी मान्यवरांसह महिला बचत गट फेडरेशनचे पदाधिकारी, सभासद, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या व ढवर, सहाण, कावीर, बामणगाव, खानाव, आक्षी, बेली, बेलकडे, रेवदंडा, नागाव, चौलमधील महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या.

याप्रसंगी चित्रलेखा पाटील म्हणाल्या, आज संवाद मेळाव्याच्या निमित्ताने इतका मोठा जनसागर बघून खर्‍या अर्थाने आनंद वाटला. शेतकरी कामगार पक्षावर प्रेम करणार्‍या या समूहातून एक वेगळी ऊर्जा मिळाली. डावा व पुरोगामी विचारांचा पक्ष नेहमी महिलांना समान हक्क देणारा आहे. महिलांना पुढे नेणारा पक्ष आहे. महिला सक्षम बनल्या पाहिजे, त्यांना चूल व मूल यापलीकडेही जगता आले पाहिजे. त्या स्वावलंबी झाल्या पाहिजेत, ही भूमिका शेकापचे नेते जयंत पाटील यांची आहे. परंतु, आजही आपल्या समाजात स्त्री-पुरुष समानता दिसून येत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. महिलांसाठी समाज व्यवस्थेचे वातावरण पोषक नाही, ही मोठी चिंतेची बाब आहे.

महिलांमध्ये प्रचंड ताकद आहे. त्या घराबरोबरच देश, राज्य, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायतीचा कारभार सक्षमपणे चालवू शकतात. माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले या थोर व्यक्तिमत्त्वांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असेही चित्रलेखा पाटील म्हणाल्या.

शेतकरी कामगार पक्षाने अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला आहे. कोविडसह अन्य आपत्तीच्या काळात गोरगरीबांसाठी काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये नेत्र तपासणीपासून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मुली शिकल्या पाहिजे या भूमिकेतून काम करताना त्यांच्यासाठी सायकली वाटप केल्या आहेत. सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दीड हजार रुपये दिले. पण, दुसर्‍या बाजूला सिलिंडरसह अन्य वस्तूंची महागाई गगनाला भिडली आहे. त्याकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. निवडणुका समोर ठेवून आमिष दाखविण्याचे काम सरकार करीत आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले.

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर आहे. महिला, तरुणींवर अत्याचार होत असताना त्यांच्याविरोधात कठोर कारवाई होत नाही, ही मोठी चिंतेची बाब आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर करुन पोलिसांनी एक चांगला निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांना खर्‍या अर्थाने सलाम केला जात आहे. महिला, मुलींची छेड काढणार्‍यांना, त्यांचा जीव घेणार्‍यांनादेखील अशीच शिक्षा झाली पाहिजे. अत्याचाराच्या घटना घडू नये यासाठी गाव, तालुका पातळीवर महिलांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. त्यासाठी महिला आघाडी अधिक मजबूत करण्याचा मानस आहे. महिलांनी ठामपणे उभे राहून या विकृतीविरोधात लढा देणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुढचा काळ हा शेतकरी कामगार पक्षाचा आहे. आगामी काळात येणार्‍या कंपन्यांनी शेतकर्‍यांना योग्य भाव दिला पाहिजे. स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे. जिल्ह्यात अनेक कंपन्या आहेत. विशेष म्हणजे, उसर भागात गेल कंपनी आहे. या कंपनीने स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. स्थानिकांना रोजगार देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र खुले केले पाहिजे, ही आपली प्रामुख्याने मागणी आहे. अलिबाग हे पर्यटनाचे प्रमुख क्षेत्र आहे. आक्षी, नागाव, मुरूड, रेवस, किहीम, मांडवा या भागात मोठ्या प्रमाणात कॉटेज आहेत. या भागात मासेमारी करणारादेखील वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पर्यटनातून महिलांना चांगले रोजगार मिळावे यासाठी प्रशिक्षण देण्याचा एक मानस आहे. मच्छिमार महिलांना उभारी देण्यासाठी खंबीरपणे काम करण्याची गरज आहे.

शेकाप हा गोरगरीबांना केंद्रबिंदू ठेवून काम करणारा पक्ष आहे. शेवटच्या घटकाच्या न्याय्य हक्कासाठी काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे शेकाप कधीही विरोधकांच्या टीकेला घाबरत नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेकडो बेरोजगारांना रोजगार मिळणार होते. परंतु विरोधकांनी निवडणुकीचे कारण दाखवून भरतीला स्थगिती आणून बेरोजगारांच्या पोटावर पाय दिला आहे. तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, ही आपली भूमिका आहे. त्यासाठी न्यायालयात जाण्याची तयारीदेखील आहे. आपण केलेल्या कामांवर विरोधक कायमच टीका करीत आले आहेत. या टीकांना कधीही भीक घालत नाही. कारण विरोधकांनी मुलींसाठी सायकली वाटप करून दाखवा, गरीबांना घरकुल द्या, नोकर्‍या, रोजगार खुले करून दाखवा, असे आव्हान चित्रलेखा पाटील यांनी विरोधकांना दिले.

मीनाक्षी पाटील यांना श्रद्धांजली
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, रायगडच्या रणरागिणी, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान राहिले आहे. महिला संवाद मेळाव्याच्या निमित्ताने मीनाक्षी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सर्वांनी उभे राहून त्यांना अभिवादन केले. त्यांच्या कार्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
महिला संवाद मेळाव्याच्या निमित्ताने पंचक्रोशीतील तीसहून अधिक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. राजकीय, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, सहकारी, बँकिंग, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
Exit mobile version