महिला विश्‍वचषक स्पर्धा; भारताची उपांत्यफेरीत धडक

आयरलॅन्डवर मात, स्मृती मंधानाची सर्वोत्तम कामगिरी

| जोहान्सबर्ग | वृत्तसंस्था |

द.आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत भारताने आयरलँडचा पाच गड्यांनी पराभव केला. या विजयासह भारताने उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.

प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकांत 156 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताची सलामीवीर स्मृती मंधानाने सर्वाधिक 87 धावांची खेळी केली. स्मृतीने 9 चौकार आणि 3 षटकारांसह धावांचा पाऊस पाडला. स्मृतीच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दमदार फलंदाजी करणार्‍या स्मृती मंधानाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. स्मृती मंधानाचे टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे 22 वे अर्धशतक आहे. महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून मंधानाच्या नावावर सर्वात मोठ्या खेळीचा विक्रम नोंदवला गेला आहे. तिने स्वतःचाच विक्रम मोडला. मंधानाने यापूर्वी 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 86 आणि 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 83 धावा केल्या होत्या.

भारतीय संघ इंग्लंड, वेस्ट इंडीज, पाकिस्तान आणि आयरलँड यांच्यासोबत ग्रुप ब मध्ये होता. या ग्रुपमधून उपांत्य फेरीत पोहचणार्‍या दोन्ही संघाची नावे निश्‍चित झाली आहे. ग्रुप ब मधून भारत, इंग्लंड या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. ग्रुप ब मध्ये इंग्लंडचा संघ अजेय आहे. इंग्लंड संघाने आपले सर्व तीन सामने जिंकले आहेत. भारताने पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि आयरलँडचा पराभव केला. तर इंग्डंकडून पराभव स्विकारला. भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारत ग्रुप ब मध्ये सहा गुणांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडचा अद्याप एक सामना बाकी आहे.

उपांत्य फेरीचं समीकरण
ऑस्ट्रेलिया, न्यूजीलंड, श्रीलंका, दक्षिण अफ्रीका आणि बांग्लादेश हे संघ ग्रुप अ मध्ये आहेत. ग्रुप अ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. अद्याप दुसर्‍या संघाचं नाव निश्‍चित व्हायचं आहे. ऑस्ट्रेलिया संघानं साखळी फेरीतील सर्व चार सामने जिंकले आहेत. या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिचा संघ अव्वल स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ दुसर्‍या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचे चार सामन्यात चार गुण आहेत. श्रीलंका आणि बांग्लादेश या संघाचं आव्हान संपुष्टात आलेय. यजमान दक्षिण आफ्रिकाने तीन सामन्यात एक विजय मिळवला असून चौथ्या क्रमांकावर आहेत. पण त्यांना उपांत्य फेरीत पोहचण्याची संधी आहे. साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेचा अद्याप एक सामना बाकी आहे. बांगलादेशविरोधात होणारा सामना दक्षिण आफ्रिाकनं मोठ्या फरकानं जिंकल्यास उपांत्य फेरीत प्रवेश निश्‍चित मानला जातोय.

Exit mobile version