रत्नागिरी लय भारी!

सलग दुसऱ्यांदा कोरले विजेतेपदावर नाव

| पुणे | प्रतिनिधी |

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी रत्नागिरीचा दबदबा कायम राखला. महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात नाशिकच्या संघाला हरवून रत्नागिरी जेट्सने सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले आहे. पुण्यात झालेल्या अंतिम सामन्यात इगल नाशिक टायटन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

रत्नागिरी जेट्सने प्रथम फलंदाजी करताना धीरज फटांगरे (27), किरण चोरमाळे (35), अभिषेक पवार (28), निखिल नाईक (36) यांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकात 160 धावा केल्या. नाशिकचा अष्टपैलू क्रिकेटर मुकेश चौधरीने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर, हरी सावंतने 2 गडी बाद केले. सलामीवीर धीरज फटांगरे वगळता रत्नागिरी जेट्सचे आघाडीच्या फळीतील इतर फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.

रत्नागिरी जेट्सने दिलेले 161 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या नाशिकचे दोन फलंदाज दहा धावांवर बाद झाले. तर, 6.2 षटकात त्यांची अवस्था 4 बाद 33 अशी झाली होती. मधल्या फळीत मुकेश चौधरीने फटकेबाजी केली. पण इतर फलंदाजांची त्याला साथ मिळाली नाही. मुकेश चौधरीने 35 चेंडूत 50 धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर एकही फलंदाज 20 पेक्षा जास्त धावा करू शकला नाही. रत्नागिरी जेट्सकडून गोलंदाजी करताना सत्यजित बच्चावने 4 षटकात 4 गडी बाद केले. तर, किरण थोरात आणि दिव्यांग हिंगणेकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

नाशिक टायटन्सला 20 षटकात 9 बाद 136 धावांपर्यंतच मजल मारता आली. रत्नागिरी जेट्सने हा सामना 24 धावांनी जिंकला.

2023 मध्येही विजेतेपद
महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वातही रत्नागिरी जेट्सने विजेतेपद पटकावले होते. 2023 मध्ये अंतिम सामन्यात केदार जाधवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोल्हापूर टस्कर्सला नमवून रत्नागिरी जेट्सने विजेतेपदावर नाव कोरले होते. आता यंदा पुन्हा एकदा रत्नागिरी जेट्सने अजिम काझीच्या नेतृत्वाखाली आपला दबदबा कायम राखत सलग दुसऱ्यांदाचे विजेतपद पटकावले.
Exit mobile version