नवतरुण कुलवंडी विजेता, दुर्वा इलेव्हन उपविजेता
| चिपळूण । प्रतिनिधी ।
अष्टविनायक कला, क्रीडा, सेवा मंडळ (रजि.) तिसंगी ता. खेड आयोजित कै. विजयराजे भोसले स्मृती चषक क्रिकेट राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नुकत्याच तिसंगी येथे 6, 7, 8 जानेवारी रोजी संपन्न झाल्या. अतिशय रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात नवतरुण क्रीडा मंडळ कुळवंडी जांभुळवाडी हे विजेते तर दुर्गा इलेव्हन तिसंगी हे उपविजेते ठरले.
सलग तीन दिवस संपन्न झालेल्या या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी ग्रामीण भागातील संघांना संधी देण्यात आली होती. दुसर्या दिवशी मुंबई उपनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांसह गुजरात, कर्नाटक, गोवा या राज्यातून आलेल्या वीस संघामध्ये अतिशय चुरसीचे सामने पाहण्यास मिळाले. तिसर्या दिवशी अंतिम फेरीचे सामने होऊन या स्पर्धेतील कै. विजयराजे भोसले स्मृती चषक- 2023 वर प्रशांत जाधव यांच्या नवतरुण क्रीडा मंडळ कुळवंडी, जांभूळवाडी यांनी आपले नाव कोरले. तर उपविजेते होण्याचा मान व्यवस्थापक रॉबिनशेठ भोसले यांच्या दुर्वा इलेव्हन या संघाने पटकावला. तृतीय क्रमांक आर. जे. इलेव्हन मीरा रोड, ठाणे येथून आलेल्या संघाने तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी यजमान अष्टविनायक हा संघ ठरला. अंतिम सामन्यातील सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर यांनाही आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.