| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवड्यात दोन्ही सभागृहांचे कामकाज व्यवस्थित होऊ शकले नाही. विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून अदानी प्रकरण, मणिपूर आणि संभलमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन गदारोळ केला. शुक्रवारीही या मुद्द्यांवरुन विरोधकांचा गदारोळ सुरुच राहिला. तसेच शुक्रवारी, बांगलादेशातील हिंदू हिंसाचार्याच्या मुद्द्यावरुन दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ केला. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेत कामकाज होऊ शकले नाही. दोन्ही सभागृहाचे कामकाज 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
शुक्रवारी लोकसभेत गौतम अदानी प्रकणावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला. लोकसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराच्या तासाने कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांच्या गदारोळामुळे प्रश्नोत्तराचा तास खंडित झाल्याने कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. दुपारी बारा वाजता कामकाज सुरू झाल्यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. यावेळी काही महत्त्वाची कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. यानंतर सभागृहाचे कामकाज 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दुसरीकडे, राज्यसभेतही जवळपास अशीच परिस्थिती होती. काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी, रंजीत रंजन, दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी नियम 267 अंतर्गत अदानी प्रकरणावर चर्चा करण्यासाठी नोटीस दिली. तर सपाचे रामजी लाल सुमन यांनी कलम 267 अंतर्गत संभल हिंसाचारावर चर्चेची मागणी केली. अध्यक्ष जगदीप धनखर यांनी सर्व नोटिसा फेटाळून लावल्या. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून सुरू झाले. 4 दिवसांत लोकसभेत कामकाज केवळ 40 मिनिटे चालले. दररोज सरासरी 10 मिनिटे सभागृहाचे कामकाज चालले आहे.