जिल्हा रुग्णालयातील प्रकार उघड; वरिष्ठ अधिकारी ठेकेदारावर मेहेरबान?
| अलिबाग | प्रतिनिधी |
निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच ठेकेदारावर सार्वजनिक बांधकाम विभाग मेहेरबान झाल्याने अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात विद्युत दुरुस्तीचे काम जोरात सुरू असल्याचे दिसून आले आहे. याबाबत कृषीवलने 8 नोव्हेंबर रेजी ‘निविदा प्रक्रियापूर्वीच ठेका’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करीत संबंधित विभागाचे बिंग फोडले होते. त्यामुळे निविदा मागविण्याची मुदत संपण्याच्या आधीच काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला काम देऊन ‘अर्थ’पूर्ण संबंध जपल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विद्युत कामाची निविदा पूर्ण झाली नसताना ठेकेदारांकडून काम केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसताना ठेकेदाराने काम सुरु केल्याचा आरोप होत आहे. या भोंगळ कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत दोडे यांनी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसताना कामकाज सुरू असल्यास कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. परंतु, सगळा अनागोंदी कारभार समोर असतानाही कारवाई होत नसल्याने नक्की पाणी कुठे मुरतेय, याबाबत उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे.
अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात विद्युत विभागामार्फत काम केले जाणार आहे. रोहित्राबरोबरच केबल टाकण्याचे काम या ठिकाणी केले जाणार आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयात तसेच परिसरात पथदिवे, इन्व्हर्टर लावण्याचे काम अलिबागसह मुरूड याठिकाणीदेखील केले जाणार आहे. या कामांसाठी तीस लाख रुपयांहून अधिक निविदा काढण्यात आली आहे. पेण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागातील कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत नोंदणीकृत कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदा स्वीकारणे आणि नाकारण्याचे अधिकार कार्यकारी अभियंता यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहेत. निविदा 31 ऑक्टोबरपासून मागवण्यात आल्या असून, त्याची अंतिम दिनांक 8 नोव्हेंबर होती. त्यानंतर 11 नोव्हेंबरला निविदा उघडली जाणार होती. परंतु, निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदरच एका ठेकेदारामार्फत जिल्हा रुग्णालयातील काम सुरू झाले आहे. याबाबत नक्की गौडबंगाल काय, असा सवाल विचारला जात आहे. त्यामुळे ही सर्व निविदा प्रक्रियाच आता संशयाच्या भोवऱ्यात आहे. असे असताना संबंधित विभाग ठेकेदारावर मेहेरबान का, याबाबत विचारणा होत आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांना संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.







