| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यापासून सावळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम आता सुरू झाले आहे. स्थानिक ग्रामस्थ यांच्याकडून सावळे गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता.
कर्जत तालुक्यातील सावळे हेदवली गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. शहापूर- मुरबाड- कर्जत या राष्ट्रीय महामार्ग 548 अ वरील सावळे फाटा ते हेदवली असणारा रस्ता हा मागील चार वर्षापूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून शासनाकडून करण्यात आला होता. परंतु, आज रोजी या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर कुठेही डांबर शिल्लक राहिली नाही. त्यामुळे मुरबाड रस्त्यावरून सावळे आणि हेडवली गावाकडे स्थानिकांना चार ते पाच किलोमीटरचा प्रवास पायपीट करून करावा लागत आहे. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी सातत्याने त्या खराब रस्त्याबद्दल आवाज उठवला होता. कर्जत तालुका प्रमुख बाजीराव दळवी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे फेब्रुवारी 2026 रोजी पत्र देऊन रस्ता नव्याने करण्याची मागणी केली आहे.
अखेर स्थानिकांच्या मागणीला यश आले असून, सावळे फाटा ते सावळे तसेच सावळे गावाचे प्रवेशद्वार ते भीमाशंकर रोडला जोडणारा रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सदर रस्त्याची प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन हा रस्ता सिमेंटचा बनविण्यात यावा अशी मागणी होत आहे. अन्यथा या रस्त्यासाठी सावळे हेदवली ग्रामस्थांकडून आणि कर्जत तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचा आंदोलन प्रशासनाच्या विरुद्ध छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. मात्र, याच रस्त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे काम मंजूर होते. या योजनेतून मंजूर असलेले कोणते काम पूर्ण झाले, किती काम पूर्ण झाले याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.






