| महाड | प्रतिनिधी |
महाडमधील खारकांड मोहल्ला येथील कवे आली कॉर्नर ते देशमुख नर्सिंग हॉस्पिटलपर्यंतच्या रस्त्याची झालेली दुरवस्था आणि पाईपलाईनच्या कामानंतर निर्माण झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यांबाबत ‘कृषीवल’ने ठळकपणे वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची संबंधित महाड नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून, रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
पाण्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची योग्य प्रकारे डागडुजी न झाल्याने या मार्गावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते. त्यामुळे नागरिक, वाहनधारक तसेच रुग्णालयाकडे ये-जा करणाऱ्या रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता धोकादायक बनला होता.
या गंभीर समस्येबाबत जमातुल मुस्लिमीन खारकांड मोहल्ल्याचे अध्यक्ष मुख्तार अकबर अली तरे यांनी प्रशासनाकडे तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. तसेच चार दिवसांच्या आत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन नगरपरिषदेवर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. दरम्यान, ‘कृषीवल’मध्ये या समस्येचे वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष देत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडलेल्या नागरिकांच्या समस्येची प्रशासनाने दखल घेतल्याचे दिसून येत आहे. ‘कृषीवल’च्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने तातडीने केलेल्या कार्यवाहीबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.







