सुधागडात ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला सुरुवात

30 खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभे राहणार

| सुधागड-पाली | वार्ताहर |

मागील दहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी व आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार मुळे यांच्या हस्ते मंगळवारी (दि.31) श्रीफळ वाढवून रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन झाले. तीस खाटांच्या या ग्रामीण रुग्णालयाचे आतापर्यंत दोन ते तीन वेळा भूमिपूजन झाले होते. मात्र भूमीपूजनाच्या पाट्यांशिवाय कोणतेच काम झाले नव्हते. ग्रामीण रुग्णालय उभे राहावे यासाठी राजकीय पुढारी, नेते, स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था-संघटना यांनी आंदोलने केली. पोंगडे महाराज यांनी सुद्धा अनेकवेळा उपोषण केले. मात्र अखेर या सर्वांच्या प्रयत्नांनी खऱ्या अर्थाने ग्रामीण रुग्णालय उभे राहत आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अनेक पदे रिक्त, साधनसामग्रीचा अभाव अशा अनेक समस्या व अडचणींमुळे तालुक्यातील सार्वजनिक आरोग्यव्यवस्था ग्रासलेली असतांना ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या कामाला सुरुवात होणे ही बाब सर्व सुधागडवासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. कारण प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील मंजूर 57 पदांपैकी तब्बल 28 पदे रिक्त आहेत. यामुळे तालुक्यातील नागरिकांना वेळेवर योग्य उपचार मिळतांना अडचणी येत आहेत. शिवाय उपलब्ध डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. पाली प्राथमिक आरोग्य केंद्रवर साधारण 43,810 इतकी लोकसंख्या अवलंबून आहे. तर जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर साधारण 28,861 इतकी लोकसंख्या अवलंबून आहे.

आता हे ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यास रुग्णांना अत्यावश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. वेळेवर चांगले उपचार मिळतील. खासगी डॉक्टरांकडे जाण्यासाठी पदरमोड करावी लागणार नाही. शिवाय तज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील. आजारी मुले, वयोवृद्ध व गरोदर महिलांना प्रसूती साठी येथेच उपचार दिले जातील.

असे असेल ग्रामीण रुग्णालय
साधारण सव्वा एकराच्या जागेत चार इमारती बनणार आहेत. यामध्ये दोन मजली इमारत रुग्णालयाची असेल. दोन इमारती डॉक्टर व कर्मचारी यांच्या निवासासाठी असतील व एक इमारत शवविच्छेदन करण्यासाठी असेल. रुग्णालय इमारतीत आपत्कालीन विभाग जनरल मेडिसिन, बालरोग विभाग, स्त्री आरोग्य विभाग असतील. रुग्णालयाचा कारभार मेडिकल सुप्रिडेंटन यांच्याकडे असेल व त्यांच्या अंतर्गत तीन तज्ञ डॉक्टर असतील. शिवाय इतर डॉक्टर, परिचारिका, औषधनिर्माण अधिकारी, टेक्निशियन व कर्मचारी असा स्टाफ असेल. ग्रामीण रुग्णालयात एक्सरे मशीन व इतर आवश्यक साधने असतील.

खूप आनंद होत आहे. लवकर काम योग्य प्रकारे पूर्ण होऊन रुग्णांची सोय व्हावी. तालुक्यातील लोकांना उत्तम आरोग्यसेवा मिळावी ही इच्छा.

डॉ. शशिकांत मढवी, तालुका आरोग्य अधिकारी, सुधागड तालुका

हे पहिले सकारात्मक पाऊल पडले आहे. ग्रामीण रुग्णालयाची इमारत पूर्ण होऊन ज्यावेळी पहिला रुग बरा होऊन बाहेर पडेल तेव्हा खऱ्या अर्थाने सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे समाधान असेल.

महेश पोंगडे, आंदोलनकर्ते
Exit mobile version