नेरळमधील शिवसृष्टीचे काम रखडले

खा. बारणे यांचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये संताप

| नेरळ | प्रतिनिधी |

राज्य सरकारच्या प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमामधून नेरळ येथील गणेश घाटावर शिवसृष्टी प्रकल्प आणि तेथील ब्रिटिशकालीन धरणाच्या सुशोभिकरण प्रकल्पाचे काम करण्यास सुरुवात झाली. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पाचे काम आजही पूर्ण झाले नाही. दरम्यान, या प्रकल्पासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून निधी प्राप्त झाला होता; परंतु त्यानंतर झालेल्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प अर्धवट राहिला आहे.

कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ ग्रामपंचायतमध्ये असलेल्या गणेश घाट आणि तेथील ब्रिटिशकालीन धरण आहे. त्या धरणामध्ये आजूबाजूला शिवसृष्टी उभारणे तसेच पदपथ निर्माण करणे आदी कामे करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास विभाग महाराष्ट्र शासनाकडून निधी मंजूर झाला होता. त्या निधीमधून कल्याण कर्जत रस्त्यावर शिवसृष्टी विकसित करून नेरळ गावात पर्यटन केंद्र विकसित करण्याचा शासनाचा मानस होता. मात्र, गणेश घाट येथे केवळ भिंती उभ्या राहिल्या असून, तीन वर्षांत शिवसृष्टी उभी राहिली नाही. त्याबद्दल नेरळकर संताप व्यक्त करीत असून, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांच्या पुढाकाराने मंजूर करण्यात आलेल्या निधीमधील विकासकामे अर्धवट ठेवण्यात आल्याने शासनाच्या पर्यटन विभागाने ताशेरे ओढले आहेत. परंतु, यानिमित्ताने नेरळ गावातील रहिवासी आणि पर्यटक यांना पर्यटन केंद्र विकसित करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट निष्फळ ठरले आहे. याबद्दल नेरळमधील रहिवासी जाब विचारणार आहेत. केवळ रखडलेले प्रकल्प असे नियोजन खासदार श्रीरंग बारणे यांच्या विकासकामांचे आहे काय, असा प्रश्न कर्जत तालुक्यात उपस्थित होते आहे.

Exit mobile version