| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
पनवेलमधील भिंगारी येथील श्री गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये सध्या मूर्ती घडविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यंदा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला साजेशी ‘माऊली विठोबा’ संकल्पनेवरील श्री गणेशाची आकर्षक मूर्ती विशेष लक्ष वेधून घेत आहे. पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी लाखो वारकरी जशी पायी वारी करतात, त्याच भावनेतून साकारण्यात आलेली ही मूर्ती गणेशभक्तांचे आकर्षण ठरत आहे. याशिवाय पारंपरिक, देखण्या आणि विविध संकल्पनांवरील श्री गणेशाच्या मूर्तीही मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जात आहेत. गणेश कारागीर अहोरात्र मेहनत घेऊन प्रत्येक मूर्तीला कलात्मक रूप देत आहेत. यंदा श्री गणेशाच्या मूर्तींच्या किमतीत सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे कारागिरांनी सांगितले. माती, रंग, सजावटीचे साहित्य, वाहतूक आणि मजुरी खर्च वाढल्याने दर वाढविणे अपरिहार्य ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कारागिरांची चिंता वाढली आहे. सततच्या पावसामुळे मूर्ती वाळविणे, रंगकाम आणि वेळेत पुरवठा करणे यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत.
भिंगारीतील कार्यशाळांमध्ये गणेशमूर्ती घडविण्याचे काम युद्धपातळीवर
