| ठाणे | प्रतिनिधी |
रेल्वे स्थानकात वाढणाऱ्या गर्दीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असताना रेल्वे प्रशासन उदासीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाण्याचे नवीन विस्तारित रेल्वे स्थानक उभारण्यासाठी ठाणे महापालिकेने जवळपास अर्धे काम पूर्ण केले असताना रेल्वे प्रशासनाने मात्र कामाला सुरूवातच केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नवीन विस्तारित स्थानक प्रकल्पात 3.77 एकर जमिनीवर रेल्वे काम करणार असून 10 एकरवर ठाणे महापालिका काम करणार आहे. यापैकी पालिकेच्या अखत्यारीत येत असलेल्या 10 एकर जमिनीवर स्टेशन इमारतीसमोर 150 मीटर लांब व 34 मीटर रुंद असा सॅटिस डेक बांधण्यात येणार आहे. वाहनांसाठी तीन मार्गिका तसेच इतर कामे ठाणे महापालिका करणार आहे. डेकचे काम जवळपास 50 टक्के पूर्ण झाले असून मार्गिकांचे काम देखील 40 टक्के पूर्ण झाले असल्याचा दावा पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आला आहे. यापैकी 3.77 एकरमध्ये जे काम रेल्वे प्रशासनाला करायचे आहे त्या कामाला अद्याप सुरवातच झालेली नाही.
आणखी दीड ते दोन वर्ष लागणार
2018 पासून या प्रकल्पाला सुरुवात झाली. या प्रकल्पाचे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र, आता या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दीड ते दोन वर्ष लागणार असल्याचा दावा पालिकेच्यावतीने करण्यात आला आहे. ठाणे स्थानकात सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन गर्दीतून लोकल पकडावी लागते. हे रेल्वे स्थानक लवकर मार्गी लागल्यास ठाणे स्थानकातील सुमारे 50 टक्के आणि मुलुंड स्थानकातील 21 टक्के प्रवाशांचा भार कमी होणार आहे. मात्र, याचे गांभीर्य रेल्वे प्रशासनाला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे खर्चात वाढ
नवे ठाणे स्थानक उभारल्याने या स्थानकामध्ये मुंबईला जाणाऱ्या गाड्या होम प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहेत. तसेच, कर्जत कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या दोन व तीन प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी वाढला असून परिणामी त्याचा खर्चही अनेक कोटींनी वाढला आहे. 2018 साली या प्रकल्पाचा खर्च हा 263 कोटी अपेक्षित धरण्यात आला होता. मात्र, आता त्यामध्ये 64 कोटींची वाढ झाली असून हा खर्च 327 कोटींवर गेला आहे. त्यामध्ये ठाणे महापालिका 142 कोटी तर रेल्वेकडून 185 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.