काशीद – मुंबई रो-रो सेवेची प्रतीक्षा लांबणीवर
| रायगड जिल्हा | प्रमोद जाधव |
ब्रेक वॉटर बंधाऱ्यासह रो- रो जेट्टी, प्रवासी जेट्टी निर्माण करण्याचे काम गेल्या पाच वर्षापासून काशीद समुद्रकिनारी सूरू आहे. परंतु, या कामाला अद्याप गती दिसून येत नाही. पाच वर्ष होत आली, तरीदेखील हे काम पुर्ण न झाल्याने पर्यटकांसह स्थानिकांची मोठी निराशा झाली आहे. काशीद – मुंबई रो-रो सेवेची प्रतिक्षा लांबणीवर जाऊ लागली आहे.
रायगड जिल्ह्यातील काशीद हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी कायमच आकर्षक ठरणार आहे. जगाच्या नकाशात काशीद समुद्र किनाऱ्याला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे. वर्षाला दोन लाखहून अधिक पर्यटक काशिदमध्ये फिरण्यासाठी येतात. काशीद समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद पर्यटक मनमुरादपणे लुटतात. मुंबई येथून मांडवा त्यानंतर मांडव्यावरून वाहनाने अलिबाग मार्गे काशिदला पोहचतात. त्यामुळे पर्यटकांना अलिबागहून काशीदला जाण्यासाठी तीन तास अधिक मोजावे लागतात. प्रवासात वेळ जात असल्याने पर्यटकांना किनारी फिरण्याचा आनंद घेण्यास जास्त वेळ मिळत नाही.
पर्यटकांचा हा त्रास कमी करण्यासाठी मुंबई ते काशीद रो- रो सेवा सूरू केल्या जाणार आहेत. मांडवा ते भाऊचा धक्का( मुंबई) या यशस्वी प्रकल्पानंतर केंद्र शासनाने सागर माला योजनेअंतर्गत मुंबई ते काशीद रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये या कामाची हालचाल सुरू झाली. गेल्या पाच वर्षापासून काशीद समुद्रकिनारी या प्रकल्पाचे काम सुरु आहे. समुद्राच्या लाटा थांबविण्यासाठी ब्रेक वॉटर बंधाऱ्यासह रो- रो जेट्टी, प्रवासी जेटी, टर्मिनल निर्माण करण्याचे काम सूरू आहे. 112 कोटी रुपयांचे हे प्रकल्प असून, 99.96 कोटी रुपये खर्च झाले आहेत. प्रकल्पाचे काम आतापर्यंत 92 टक्के पुर्ण झाले आहे. मुंबईहून काशिदला जलवाहतूकीने अवघ्या दोन तासात पोहचता येणार आहे. त्यामुळे ही सेवा पर्यटकांसह स्थानिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. मात्र, काशीद येथील ब्रेक वॉटर, पार्कींग, रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. जेट्टीचे काम राज्य शासनामार्फत केले जाणार आहे. त्यासाठी 42 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. निविदाची प्रक्रीया पुर्ण करण्यात आली आहे. परंतु, प्रत्यक्षात कामाला गती नसल्याने रो-रो सेवेची प्रतिक्षा अधिकच लांबणीवर गेली आहे. ठेकेदाराकडून काम संथ गतीने होत असल्याचा फटका पर्यटकांसह स्थानिकांना बसत आहे. मुंबई ते काशीद रो- रो सेवा कधी सुरू होणार याची प्रतिक्षा पर्यटकांना लागून राहील आहे. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर करण्यात यावा, अशी मागणी प्रवासी वर्गांकडून केली जात आहे.
रोरो जेट्टीची निवीदा काढण्यात आली आहे. 42 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. सध्या ब्रेक वॉटर रस्ता, पार्कींगचे काम सुरु आहे. हे काम डिसेंबपर्यंत पुर्ण होईल. तसेच जेट्टीचे काम पुढच्या महिन्यापासून सूरू केले जाईल.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड अभियंता विभाग
