नेरळ-कशेळे राज्यमार्गाचे काम संथ गतीने

ठेकेदाराचा हलगर्जीपणा, सामान्यांना मनस्ताप

| नेरळ | वार्ताहर |

नेरळ-कशेळे या राज्यमार्गाचे सुरू असलेले काम हे संथ गतीने होत असून, सध्या हा रस्ता वातुकीसाठी धोकादायक बनला. ठेकेदाराची मर्जी होईल तेव्हा रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जात आहे, तर मनात येईल तेव्हा काम बंद ठेवले जात आहे. दरम्यान, रस्त्याच्या या अर्धवट कामामुळे नाहक सामान्य नागरिकांना मनस्ताप भोगावा लागतो. शिवाय, येथे अपघातदेखील घडत आहे. ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी ना सूचना फलक लावले, ना सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

उरण-पनवेल-नेरळ-कशेळे भीमाशंकर मंचर हा भीमाशंकर राज्यमार्ग म्हणून महत्त्वाचा आहे. कायम वाहनांच्या वर्दळीचा रस्ता म्हणून या रस्त्याचे काम होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण केले जात आहे. नेरळ-कशळे मार्गातील साई मंदिर ते कोल्ह्यारे चार फाटापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असून, पुढील काम सुप्रिया हॉटेलपर्यंत एक मार्गिका काही तयार करण्यात आली. परंतु, ठेकेदाराने हे काम करीत असताना कुठल्याही प्रकारे सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना केलेलेल्या दिसत नाही. साधे सूचना फलकसुद्धा या ठेकेदाराला लावावेसे वाटले नाही का, असा प्रश्‍न आहे.

जो सिमेंट काँक्रिट रस्ता तयार झाला त्यावर मातीचा थर जमा होऊन खडी रस्त्यावर दिसत आहे, यामुळे येथे मोटारसायकलला अपघात घडत आहेत. यावर स्थानिक नागरिक लालू चंचे यांनी हे काम लवकरात लवकर करण्यात यावे म्हणून मागणी केली आहे. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजीव वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकलेला नाही.

एकूणच रस्त्याच्या कामात ठेकेदाराकडून होत असलेला हलगर्जीपणा हा येथील प्रवासी धारकांच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची सार्वजनिक बांधकाम विभाग वाट पाहतो का? ठेकेदारावर कारवाई होणे गरजेचे आहे. परंतु, असेही होताना दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाने ठेकेदाराला समज देऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर करून घेणे गरजेचे आहे. मान्सून तोंडावर येऊन ठेपला असून, न जाणो येथे वाहने रस्त्यावर साठलेल्या मातीवर घसरुन अपघात ग्रस्त होतील. त्यामुळे आता तरी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ठेकेदार आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version