| पनवेल । वार्ताहर ।
सूरत येथील बस स्थानकाच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळाच्या पनवेल येथील एसटी बस स्थानकाचा विकास करण्यात येणार आहे. हा नवीन बस डेपो उभारण्यासाठी 230 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पनवेल मास ट्रान्झिट कंपनीला हे टेंडर मिळाले आहे. येत्या तीन महिन्यात सर्व मंजुर्या मिळवून स्थानकाच्या बांधकामाला सुरवात करण्यात यावी, असे निर्देश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिले आहेत.
राज्य परिवहन विभागाकडून पनवेल एसटी स्थानकाच्या इमारतीचा नवीन आराखडा जाहीर करण्यात आला होता; मात्र या आराखड्याला पनवेल महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून दुरुस्ती सूचवण्यात आली होती. तसेच बांधकाम नियमात बदल झाल्याने एसटी स्थानकाचा नवीन आराखडा महापालिकेकडे एका महिन्यात पाठवण्यात येणार आहे.
व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी पनवेल मास ट्रान्झिट कंपनीच्या अधिकार्यांशी मुंबई येथे बैठक घेतली. या बैठकीला एसटी महामंडळाचे अधिकारी, वास्तुविशारद उपस्थित होते. राज्य परिवहन महामंडळाच्या पनवेल येथील एसटी स्थानकाचा विकास सूरत स्थानकाच्या धर्तीवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा नवीन डेपो उभारण्यासाठी 230 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
असे असेल एसटी आगार
17,500 स्क्वे. फुटाचे बस पोर्ट असेल. यामध्ये तळमजल्यावर वाहतूक नियंत्रक कक्ष, प्रवाशी विश्राम कक्ष आणि बस थांबा, त्यामध्ये 30 फलाटांची रचना केली आहे. प्रवासी फलाटावरून गाडीच्या दरवाजात विमानाप्रमाणे जातील. प्रवाशी आजूबाजूच्या मोकळ्या जागेत जाऊ शकणार नाही. दुसर्या मजल्यावर महामंडळाचे कार्यालय तर बेसमेंटला पार्किंग व दुरूस्ती विभाग. बाजूला अधिकारी व कर्मचार्यांसाठी निवासस्थाने असे नियोजन करण्यात आले आहे. बस स्थानकातून रेल्वे स्टेशनपर्यंत एव्हीलेटर बांधण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दोन्हीकडे जाणे-येणे सोपे होणार आहे. या कामाला सुरुवात झाल्यापासून 24 महिन्यांत काम पूर्ण करायचे आहे. काम वेळेत पूर्ण न झाल्यास एजन्सीला मोठा दंड आकारण्यात येणार आहे.