पेंधर-खारघर मार्गाच्या कामाला गती

| पनवेल | ग्रामीण प्रतिनिधी |

पेंधर ते तळोजा फेस-2 मार्गे खारघरला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला सध्या वेग आला आहे. मुंब्रा-पनवेल मार्गावरील उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाल्याने पुढील जोडरस्त्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. या प्रकल्पामुळे पेंधर, तळोजा फेस 1 आणि 2 तसेच तळोजा औद्योगिक वसाहत परिसरातील वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. येथील रहिवाशांना अवघ्या काही मिनिटांत हार्बर रेल्वे मार्गावरील खारघर रेल्वे स्थानक गाठने शक्य होणार आहे. सध्या या मार्गावर डांबरीकरण, रस्त्याचे रुंदीकरण तसेच सुरक्षा बॅरिअर्स उभारण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी बेस लेयर आणि स्ट्रक्चरल कामे पूर्ण झाली असून, अंतिम टप्प्यातील कामे युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून येते. मुंब्रा-पनवेल मार्गावरील उड्डाणपूल पूर्ण झाल्यामुळे या नव्या जोडरस्त्याला थेट कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. त्यामुळे पेंधर, तळोजा आणि खारघर परिसरातील नागरिकांना पर्यायी व जलद मार्ग उपलब्ध होणार आहे. विशेषतः दैनंदिन प्रवाशांसाठी हा मार्ग वेळ व इंधन बचतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाचे स्वागत केले असून, यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. संबंधित यंत्रणांकडून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असून, काम पूर्ण होताच हा मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Exit mobile version