भिसे खिंडीतील संरक्षक भिंतचे काम सुरू

दैनिक कृषीवलच्या बातमीची घेतली दखल

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठणे-रोहा मार्गावरील त्या धोकादायक वळणावर संरक्षक भिंत बांधण्याचे काम अखेर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रोहा उपविभागाकडून नुकतेच सुरु करण्यात आले आहे. अत्यंत धोकादायक असलेल्या या वळणावरील संरक्षक कठडे बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते अजून काही जीवघेण्या अपघातांची वाट बघतेय का? अशा आशयाचे वृत्त दैनिक कृषीवलमध्ये काही दिवसांपूर्वीच प्रसिध्द करण्यात आले होते. त्याची दखल घेत हे काम सुरु करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

नागोठणे-रोहा राज्य मार्गावरील नागमोडी वळणे असलेल्या धोकादायक भिसे खिंडीत अनेक ठिकाणचे संरक्षण कठडे तुटल्यामुळे तसेच संरक्षण कठड्यांचे लोखंडी पाईप तुटल्यामुळे वाहनांना अपघात होऊन वाहने दरीत कोसळून अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली होती. जणु काही हे तुटलेले संरक्षण कठडे अपघाताला निमत्रंणच देत असल्याचे दिसून येत होते, असे असतांनाच यावर सार्वजनिक बांधकाम खाते कोणतीही उपाययोजना करीत नसल्याने हे संरक्षक कठडे बांधण्यासाठी बांधकाम खाते एखाद्या मोठ्या व जीवघेण्या अपघाताची वाट पाहत आहेत का? असा प्रश्न या मार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवासी वर्गातून उपस्थित करण्यात येत होता. या प्रकाराबद्दल त्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. आता हे काम सुरु करण्यात आल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

याचबरोबर भिसे खिंडीतील दरीच्या बाजुला मजबूत लोखंडी रेंलिग व सिमेंटचे संरक्षण कठडे बांधणे, रात्री वाहनचालकांना मार्ग दिसण्याकरीता रेडियममध्ये फलक लावण्यात यावे. या सर्व गोष्टी केल्या तर प्रवासी वर्ग व वाहनचालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होऊन त्यांना सुखरुप प्रवास करता येईल. त्यामुळेच भिसे खिंडीतील ही कामेही तातडीने करावीत अशी मागणीही प्रवाशांतून होत आहे.

Exit mobile version