संरक्षक भिंतीचा प्रश्न ऐरणीवर; प्रवासी संतप्त
। माणगाव । प्रतिनिधी ।
ताम्हिणी घाटात काहीच दिवसांपूर्वी कार दरीत कोसळून तीन जण ठार झाल्याची घटना घडली. त्यामुळे घाटातील धोकादायक प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे घाटातील अवघड धोकादायक वळणे काढून सुलभ व पर्यायी रस्ता तयार करावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी संरक्षक भिंतीची आवश्यकता आहे, तेथे त्या उभ्या कराव्यात व कमकुवत झालेले संरक्षण कठडे नव्याने बांधावेत, अशी मागणी नागरिक, प्रवासी व पर्यटकांतून होत आहे. या रस्त्याचा प्रश्न प्रसारमाध्यमांनी अनेक वेळा मांडला. मात्र, याकडे शासनाने गांभीर्याने पाहिलेले नाही. धोकादायक वळणे, संरक्षक भिंती कमकुवत असल्याने प्रवासी, पर्यटकांचा जीव दिवसेंदिवस धोक्यात येत असून, ताम्हिणी घाट आणखी किती बळी घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
आंतरराष्ट्रीय दिघी बंदराशी जोडणार्या माणगाव-ताम्हाणी-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटाच्या संरक्षक भिंती धोकादायक झाल्या आहेत. त्याकडे शासनाच्या संबंधित खात्याने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. अनेक वर्षापूर्वी या मार्गावर काही ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्यात आल्या होत्या. त्या सध्या कमकुवत झाल्या आहेत. ताम्हिणी घाटातील कमकुवत संरक्षक भिंतीमुळे अपघाताला सध्या निमंत्रण मिळत आहे. तर अनेक धोकादायक ठिकाणी संरक्षक कठडे नसल्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना असुरक्षित वाटत आहे.
या मार्गांनी अनेक पर्यटक रायगड दर्शनासह कोकण दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात. मुळातच हा मार्ग अनेक ठिकाणी अरुंद आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूनी झाडेझुडपे मोठया प्रमाणात वाढली असून वळणावर समोरून येणारे वाहने दोन्ही वाहनाच्या चालकांना दिसत नाही. या संरक्षित भिंतींची डागडुजी किवा दुरुस्ती झाली नाही. ती प्राधान्याने करावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत असून, ही धोकादायक वळणे प्रवासी व वाहनचालकाची डोकेदुखी ठरत आहे. 1998-99 मध्ये या रस्त्याचे काम करण्यात आले. त्यावेळेस पुणे-दिघी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करण्यात आला. त्यावेळेस काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम डबर सिमेंटमध्ये करण्यात आले होते. परंतु, ते काम मजबूत झाले नसल्यामुळे या संरक्षक भिंती आता कमकुवत झाल्या आहेत.
या रस्त्याच्या साईडला खोल दर्या आहेत. त्यातच हा मार्ग अरुंद आहे. त्यामुळे समोरून येणार्या वाहनचालकांना धोका जाणवत आहे. काही ठिकाणी अवघड वळणांवर संरक्षणासाठी पत्र्याचे कवच उभारले आहे. तर काही ठिकाणी अवघड वळणांवर कोणत्याही प्रकारचे संरक्षणासाठी बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे हा रस्ता अपघाताला निमंत्रण देत आहे. रायगड जिल्ह्यातील आंबेळी घाटातील अपघाताची पुनरावृत्ती या मार्गावर घडू नये. या साठी आगोदरच उपाययोजना शासनांनी करावी असी मागणी नागरिक, पर्यटकांतून होत आहे.
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
ताम्हिणी घाटातील रस्ता हा पूर्णतः नागमोडी वळणाचा तसेच चढ व उतार असल्यामुळे ज्या ठिकाणी अवघड वळणे आहेत, त्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधणे आवश्यक आहे. परंतु अनेक ठिकाणी संरक्षक भिंतीचा अभाव असून खोल दर्यांमुळे वाहन चालकांना धोका संभवतो.श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर, माणगावसह दक्षिण रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असून या ताम्हिणी घाटामध्ये अनेक ठिकाणी संरक्षक भिंती नाहीत. तेथे सार्वजनिक बांधकाम खात्याने अवघड वळणांवर संरक्षक भिंतीचे बांधकाम केले पाहिजे.