| रेवदंडा | प्रतिनिधी |
पर्यटन वाढीसाठी सागरी वाहतुकीस राज्य शासन भर देत असून मांडवा रो-रो जेट्टीच्या धर्तीवर कोकण किनारपट्टीवर ठिकठिकाण रो-रो जेट्टी उभारण्याचे काम हाती घेतले गेले आहे. त्यापैकी रेवदंडा मोठे बंदर येथे कुंडलिका समुद्र खाडीच्या मुखावर रो-रो जेट्टी उभारण्याचे कामास प्रारंभ झाला आहे.
मुंबईहून थेट रत्नागिरीपर्यंत रो-रो सेवा शासन सुरू करण्याचा प्रयत्नात आहे. त्यामुळे मांडवा रो-रो सेवेसाठी उभारलेल्या जेट्टी पाठोपाठ मुरूड तालुक्यातील काशिद व अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे मेरीटाईम बोर्डाच्या कक्षेत रो-रो जेट्टी बांधण्यात येत आहे. अंदाजे 120 कोटी रूपयांचा निधी या रो-रो जेट्टीसाठी मंजूर झाला आहे. रेवदंड्यातील रो-रो जेट्टीचे काम मे. अजवानी इंन्फ्रास्ट्रचर प्रा.लि. या कंस्ट्रक्शन कंपनीस देण्यात आले आहे. यामध्ये ब्रेक वॉटर तसेच रो-रो जेट्टीचे बांधकाम करण्यात येत आहे. येत्या दोन वर्षाच्या कालावधीत हे काम या कंस्ट्रशन कंपनीने पुर्ण करायचे आहे. रेवदंड्यातील रो-रो जेट्टीने मुरूड व अलिबाग तालुक्यातील पर्यटनात मोठी वाढ होणार आहे.







