| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर निवारा शेड बांधण्याचे काम सुरू असल्यामुळे प्रवाशांचे आता उन्हापासून संरक्षण होणार आहे. यापूर्वी या स्थानकातील फलाट दोनवर कोणतीही निवारा शेड नव्हती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ स्थानकात प्रवासी निवडा शेड बांधण्यास सुरुवात केली आहे.
ब्रिटिश काळात बनलेल्या नेरळ स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर केवळ दोन प्रवासी डब्ब्यांसाठी निवारा शेड होती. त्यानंतर अनेक वर्षे त्या ठिकाणी नवीन निवारा शेड उभारण्यात आली नव्हती. त्यात आता नेरळ स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोमध्ये आहे. त्यामुळे या स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना निवारा शेड अभावी उन पावसात ताटकळत उभे राहावे लागत होते. त्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान, मुंबई रेल कॉर्पोरेशन यांच्याकडून नेरळ स्थानकाचा कायापालट करण्याचे घेण्यात आलेले धोरण लक्षात घेता नेरळ स्थानकाला नवीन रूप दिले जात आहे.त्यात फलाट एक वरील संपूर्ण परिसर स्काय वॉकमुळे बंदिस्त करण्यात आला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निवारा शेड निर्माण झाली. त्यानंतर आता नेरळ स्थानकाच्या फलाट दोनवरील अपुर्णावस्थेत असलेल्या निवारा शेडचे काम देखील सुरू झाले आहे. या निवारा शेडमुळे प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात 15 डब्यांची लोकल कर्जतपर्यंत येणार असल्याने त्या दृष्टीने नेरळ स्थानकाची लांबी देखील वाढवली गेली आहे. त्या सर्व भागाला निवारा शेड उभे केले जात असल्याने प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.






