162 कोटींच्या कामात दिरंगाई; कोकण रेल्वेला पालिकेची कायदेशीर नोटीस
| पनवेल | ग्रामीण प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेचे महत्त्वाकांक्षी मुख्यालय असलेल्या ‘स्वराज्य’ इमारतीच्या अंतर्गत सजावटीच्या कामात मोठी दिरंगाई होत असल्याने पालिकेने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. ठरलेल्या टप्प्यांनुसार कामाचा वेग नसल्याने प्रशासनाने अखेर कठोर भूमिका घेतली आहे.
पनवेल नगरपरिषदेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने जुनी इमारत अपुरी पडू लागली होती. त्यामुळे महापालिकेने सिडकोकडून तब्बल 28 कोटी रुपये खर्च करून 5 एकर भूखंड विकत घेतला होता. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीसमोरील या जागेवर ‘स्वराज्य’ मुख्यालयाची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, इमारतीतील फर्निचर, इलेक्ट्रिकल व्यवस्था, फाइल सिस्टीम आणि इतर अंतर्गत सजावटीसाठी 162 कोटी रुपयांचे कंत्राट कोकण रेल्वे कॉर्पोरेशन कंपनीला देण्यात आले होते. मे 2027 पर्यंत काम पूर्ण करण्याची हमी कंपनीने दिली होती. मात्र, प्रत्यक्षात काम सुरू होऊन 6 महिने उलटूनही कामाचा वेग अत्यंत मंद असल्याचे समोर आले आहे.
पनवेल महानरपालिकेने यापूर्वी अंतर्गत नोटीस देत कामाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. तरीही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने अखेर गेल्या आठवड्यात कंपनीला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. आता या नोटिसीला समाधानकारक उत्तर न दिल्यास अथवा कामात गती न आणल्यास कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
140 कोटींचा खर्च
‘स्वराज्य' या भव्य मुख्यालयाच्या बांधकामासाठी महापालिकेने सुमारे 140 कोटी रुपये खर्च केले आहेत. आता प्रशासनाचा भर अंतर्गत सजावटीची कामे वेगाने पूर्ण करून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे स्थलांतर नव्या वास्तूत करण्यावर आहे. अन्यथा सध्याच्या विविध कार्यालयांच्या देखभालीचा अतिरिक्त आर्थिक भार महापालिकेवर कायम राहणार आहे.
महापालिकेच्या ‘स्वराज्य’ मुख्यालयातील इंटिरिअरचे काम अपेक्षित गतीने होत नाही. यापूर्वी कंपनीच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. मात्र, सुधारणा न झाल्याने अखेर कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
संजय कटेकर,
शहर अभियंता, पनवेल महापालिका







