समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात

| नागाव | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या नागाव-बदामी समुद्रकिनारा परिसरातील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले हे काम आता प्रत्यक्षात सुरू करण्यात आले आहे. ग्रामस्थांची गरज लक्षात घेऊन नागाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आले असून, बुधवार दि.19 ऑगस्टपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या कामाचा शुभारंभ नागावच्या सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रियांका काठे, शांभवी म्हात्रे, परेश ठाकूर, वीणा पिंपळे यांच्यासह पद्माकर गुरव, मनोहर ठाकूर, राजेंद्र ठाकूर, अरुण गुरव, अनिल मानकर, अक्षय मानकर, अभिषेक नाईक, शुभम गुरव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

नागाव येथील बदामी समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या सुमारे 250 ते 300 मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी पंधराव्या वित्त आयोगातून 1.50 लाख रुपये, तर ग्रामपंचायत स्वनिधीतून 5 लाख रुपये, असा एकूण 6.50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. हा बदामी समुद्रकिनाऱ्याकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता असून, काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटकांचीही मोठी सोय होणार आहे. तसेच, या रस्त्याची वाहतूक अधिक सुरक्षित व सुलभ होण्यासही मदत होणार आहे. या कामासाठी सरपंच हर्षदा मयेकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक निधीची उपलब्धता व कामाची कार्यवाही पूर्ण करून घेतली.

Exit mobile version