| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण पूर्व विभागात वाहने आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाची सोय करण्यासाठी, तीन वर्षांपूर्वी पाडण्यात आलेल्या पुलाची सध्या मध्य रेल्वेकडून पुनर्बांधणी केली जात आहे. गव्हाणफाटा-चिरनेर मार्गांवरील कंटेनर मालवाहतूक रेल्वे उड्डाणपूलाच्या स्लॅबचे काम झाले असून, आत्ता पुलावरील पादचारी मार्ग आणि पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षण कठडे बांधण्याचे काम सुरु आहे. एकंदरीत या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, मार्च अखेर पूर्ण होणारे हे पुलाचे काम एप्रिल 2026 अखेरीस पूर्ण होऊन पूल वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे.
हा पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर दैनंदिन पाच हजार प्रवासी व वाहनचालकांची प्रतिक्षा संपणार असून, दरररोजची मागील तीन वर्षांपासून होणारी गैरसोय दूर होणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे उरण पूर्व विभागातील चिरनेर,आवरे वशेणी, केळवणे खोपटा मार्गांवरील एसटी बस प्रवास सुरु होऊन रिक्षा व अन्य वाहनातून नागरिकांना पनवेल, मुंबई, नवीमुंबई व ठाणे मार्गांकडे जाण्यासाठी सुलभ होणार असून, प्रवास सुखकर होणार आहे.त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेआहे. तीन वर्षे प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांची प्रतिक्षा संपणार असून, एक किमी वळसा घेऊन जाणाऱ्या वाहनांसाठी एप्रिल अखेरीस हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे मध्यरेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
रेल्वे उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात
