। जेएनपीटी । वार्ताहर ।
उरण शहरातील बाह्यवळण मार्गाचे काम गेली अनेक वर्ष रेंगाळत असल्याचे असल्याचे चित्र आहे. यामुळे शहरातील नागरिकांना प्रचंड असुविधेचा सामना करावा लागत असून, लवकरात लवकर हे प्रलंबित काम मार्गी लावण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. उरण तालुक्याचे औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. तालुक्यातील खेड्याचे व उरण शहराचे नागरीकरण ही झपाट्याने वाढत आहे.वाढत्या नागरिकांच्या नागरी सुविधांची पूर्तता करणारी मुख्य बाजारपेठ तसेच शासकीय कार्यालये उरण शहरात असल्याने या शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची रेलचेल सुरू असते. यामुळे उरण शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. अशा वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी उरण कोटनाका ते उरण पेन्शनपार्क येथून, बाह्यवळण रस्त्याची निमिर्ती करण्यात यावी, अशी मागणी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्याकडे केली होती.
या अनुषंगाने तात्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी सिडको, उरण नगरपालिका आणि संबंधित अधिकारी व गोपाल पाटील यांच्या मागणीनुसार आपल्या दालनात बैठक बोलवण्यात आली. या बायपास रस्त्याच्या जागेचे सर्वेक्षण करून तात्काळ निधी मंजूर करण्यात यावा, असे आदेश संबंधित अधिकारी वर्गाला देण्यात आले. परंतू गेली अनेक वर्षे शासन, सिडकोकडून निधीची मंजूरी, निविदा प्रक्रीया आदी औपचार घडूनही गेली अनेक वर्षे उरण बायपास रस्त्याचे काम रखडले आहे. यामुळे सध्या अनाधिकृत बांधकाम व्यावसायिकांनी आपले बस्तान या बायपास रस्त्या परिसरात मांडण्यास सुरुवात केली आहे.