| पनवेल | प्रतिनिधी |
सिडको महामंडळाच्या घोट गावाशेजारील नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये एका कामगाराचा डम्परच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडली. धर्मा बाळाराम पाटील (55) असे मृत कामगाराचे नाव आहे.
सिद्धी करवले गावात राहणारे धर्मा यांचा मुलगा राकेश याने तळोजा पोलिसांत याविषयी तक्रार नोंदवली. तक्रारीमध्ये सिडकोच्या नागरी घनकचरा प्रक्रिया व व्यवस्थापन प्रकल्पामध्ये सकाळी डम्पर क्रमांक एम.एच. 46 सीयू 2672 या डम्परचालकाने मागच्या दिशेला डम्पर चालवताना हॉर्न दिला नाही, तसेच आवाजही दिला नाही. यामुळे या डम्परच्या मागील चाकाखाली घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात काम करणार्या धर्मा यांच्या अंगावरून डम्पर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर डम्परचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी डम्परचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.