खालापूरातील वायर कंपनीत २५ फुटावरून पडून कामगाराचा मृत्यु

कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणा विरोधात गुन्हा दाखल
। खोपोली । प्रतिनिधी ।

ढेकू गावातील सिस्टीमिटीक वायर प्रा.लि कंपनीमधील रफीक नवाज खान (वय-४०, रा.जालना) या तरूणाचा पंचवीस फुटावरील पत्र्याच्या शेडवरून पडून मृत्यु झाल्याची घटना रविवारी (दि.१२ जून) सायंकाळ पाच वाजण्याच्या सुमारास घडली.


साजगाव ग्रामपंचायत हाद्दीतील ढेकू गावात लोखंडी वायर तयार करणाऱ्या सिस्टीमिटीक वायर कंपनीत काम करणारी सदर मयत व्यक्ती ही कंपनीतील पत्र्याच्या शेडवर डांबर टाकण्यासाठी चढली असता शेडवरून पडून मृत्यु झाला. या दरम्यान पत्रा फुटल्याने डांबराच्या बादलीसह २५ फुटावरून खाली पडला. कामगाराच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यात कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणा केला असल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासात निदर्शनात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कंपनी व्यवस्थापकांनी तातडीने नगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात आणले परंतु रफीक खान याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या घटनेबाबत खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहय्यक पोलिस निरिक्षक हरेष कळसेकर करीत आहेत.

पोलिसांनी केली ३ लाखांची मदत
पोलिसांनी प्राथमिक तपास करून खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह शवविच्छेदनासाठी हालविण्यात आला. नातेवाईकांनी भरपाई दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यावर पोनि शिरीष पवार यांनी मध्यस्थी करीत मृताच्या कुटूंबाला प्राथमिक स्तरावर तीन लाखांची मदत मिळवून दिली.

Exit mobile version