| महाड | प्रतिनिधी |
एमआयडीसीतील रिलायबल केमिकल कंपनीच्या परिसरात रविवारी (दि.7) सकाळी भीषण अपघात घडला. छतावरील तुटलेल्या सिमेंट पत्र्याची दुरुस्ती करताना 41 वर्षीय कामगाराचा तोल जाऊन खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सवाने येथील रिलायबल केमिकल कंपनीत ही घटना घडली. श्रवणकुमार राजाराम यादव हे जितेंद्र तेज बहादुर गौतम यांच्या बरोबर कंपनीच्या छतावरील तुटलेले सिमेंटचे पत्रे दुरुस्त करण्यासाठी गेले होते. पाहणी करताना श्रवणकुमार यादव हे तुटलेल्या पत्र्यावर चढले. त्याचवेळी अचानक पत्रा तुटल्याने ते सुमारे 20 ते 25 फूट उंचीवरून थेट जमिनीवर कोसळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उंचीवर काम करताना सुरक्षेची साधने वापरण्यात आली होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. कंपनी प्रशासनाने सुरक्षा नियमांचे पालन केले की नाही, याचीही चौकशी होणार आहे.
Reliable Chemical Company: छतावरून पडून कामगाराचा मृत्यू
