| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू झाला. यावेळी कंपनी प्रशासनाकडून भरपाई देण्यास टाळाटाळ करण्यात आली. मात्र, नातेवाईकांनी या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. अखेर कंपनीतील एका एजन्सीने अखेर भरपाई देण्यास होकार दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. हा मृत्यू काम करताना हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचे एसकेबी एजन्सीकडून सांगण्यात आले.
एसकेबी एजन्सी मार्फत मिळालेल्या माहितीनुसार, उसर येथील गेल कंपनीत काम सुरू आहे. वेगवेगळ्या एजन्सी द्वारे काम केले जात आहे. एसकेबी सिव्हील टेक प्रोजेक्ट लि. या एजन्सीद्वारे कंपनीत शुक्रवारी (दि.27) सायंकाळी श्रीराम भगत हा कामगार हेल्पर म्हणून काम करत होता. त्याला अचानक हृदय विकाराचा झटका आला. त्याला अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मात्र, मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. कंपनीतील एजन्सीने फक्त भरपाई म्हणून 1 लाख रुपये देण्याचा प्रयत्न केला. परंतु, मृताच्या नातेवाईकांनी तुटपुंज्या भरपाईचा तीव्र विरोध केला. मुबलक प्रमाणात भरपाई द्यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली. अखेर एजन्सीने नमते घेत 5 लाख भरपाई देण्याचे ठरल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला, अशी माहिती एजन्सीचे रणजीत कुमार आणि निमेश सिंग यांनी दिली.






