। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जवळील जेएनपीटी रोडवरील पाडेघर येथील के. के. लॉजिस्टिक यार्डमध्ये दोन ट्रकच्या भीषण धडकेत एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर आरोपी ट्रकचालकाने पलायन केले असून, पनवेल शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. शंकरलाल संतलाल यादव (36) असे मृत कामगाराचे नाव असून, तो उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. तो दोन दिवसांपूर्वीच कामानिमित्त उरणमधील जासई येथील ट्रकचालक भाऊ धर्मेंद्र यादवकडे आला होता. धर्मेंद्र शुक्रवारी सकाळी ट्रक धुण्यासाठी वॉशिंग सेंटरवर गेला होता. तेथील एका कंटेनरचा मागील दरवाजा उघडण्यास शंकरलाल मदत करत असताना, पाठीमागून आलेल्या दुसऱ्या ट्रकचालकाने शंकरलालला धडक दिली. त्यात शंकरलाल चिरडला गेला. त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.







