पत्र्यावरून पडून कामगार ठार

| धाटाव | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीत खते निर्मिती करणार्‍या ट्रांसवर्ड फर्टिकेम कारखान्यात उंचावर पत्र्याचे काम सुरू असताना पत्र्यावरून पडून कामगार जागीच ठार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर मयत तरुणाच्या नातेवाईकांना भरघोस मदत मिळावी म्हणून रोह्यात उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात असलेला मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी, ग्रामस्थांनी नकार दिला.

कंपनी व्यवस्थापन आणि ग्रामस्थ यांच्यात सदर घटनेबाबत दुसर्‍या दिवशीही कुठलाही तोडगा न निघाल्याने वातावरण तंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊन नये तसेच, शांततेचा भंग होऊ नये म्हणून उपजिल्हा रुग्णालयात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. जवळपास 50 पोलीस कर्मचारी, अधिकारी व जवान या ठिकाणी हजर असल्यामुळे परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, घडलेल्या दुर्घटनेमुळे कामगार वर्गात एकच खळबळ उडाली असून, येथील वातावरण मात्र भयभीत झाल्याचे पहावयास मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, संकेत पाटील (26, रा.आंबेघर-नागोठणे) असे मयत तरुणाचे नाव असून, मयत तरुण संकेत पाटील, रवी रघुनाथ वाघमारे (24, रा. धामनसई, ता. रोहा ) व अन्य दोन असे एकूण 4 कामगार शुक्रवारी (14) रोजी दुपारी 4 च्या सुमारास धाटाव औद्योगिक वसाहतीतील ट्रान्सवर्ल्ड फर्टीकेम प्रा.लिमिटेड या कंपनीतील गेटसमोर असलेल्या हॉलवरील तुटलेले पत्रे दुरुस्तीचे काम करीत होते. उंच ठिकाणी काम करीत असल्यामुळे सेफ्टीबेल्ट लावून पत्रे दुरुस्त करीत असताना सेफ्टीबेल्ट ज्या रस्सीला बांधला होता, ती रस्सी मध्येच तुटल्याने कामगार संकेत पाटील हा सेफ्टी बेल्टसहित खाली सिमेंट काँक्रिटवर पडून त्याच्या डोक्याला, हाताला, पायांना कंबरेला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने रोहा उपज्ल्हिा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मयत घोषित केले.

कंपनीत घडलेल्या अपघातात गावातील तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच मयताच्या नातेवाइकांसह आंबेघर ग्रामस्थांनी रोहा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेउन कंपनी व्यवस्थापनकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली.होती. नातेवाईक, ग्रामस्थांसह कामगार वर्ग मोठ्या संख्येने जमा झाल्याने या ठिकाणी जमलेल्या जमावानंतर पोलीस कर्मचार्‍यांची जादा कुमक बोलविण्यात आली होती. तर शनिवारी दुपारपर्यंत शासकीय रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचेही पहावयास मिळाले. याविषयी कामगार रवी वाघमारे याच्या फिर्यादीनुसार आकस्मिक मृत्यू झाल्याचा गुन्हा रोहा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

अखेर दुपारनंतर याबाबत योग्य तो तोडगा निघाल्यानंतर नातेवाईक आणि ग्रामस्थानी मृतदेह ताब्यात घेतला. सध्या परिस्थिती शांत असल्याची माहिती रोहा पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेचा तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Exit mobile version