दोन लाखांचा भुसा हस्तगत
| पनवेल | वार्ताहर |
गुदद्वारात सोन्याचा भुसा लपवून चोरी करणार्या एका कामगाराला कंपनीतील सुरक्षा रक्षकांनी पकडल्याची घटना तुर्भे एमआयडीसीतील एका कंपनीत उघडकीस आली आहे. राजेश बुधवानी (48) असे आरोपी कामगाराचे नाव असून त्याने तब्बल दोन लाख 13 हजार किमतीचा सोन्याचा भुसा आपल्या गुदद्वारात लपवल्याचे आढळून आले. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
राजेश बुधवानी हा तुर्भे एमआयडीसीतील ओरो प्रेशियस मेटल्स प्रा.लि.या कंपनीत सोने पॉलीश करण्याच्या मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याच्याजवळ मोठ्या प्रमाणात सोन्याचा बारीक भुसा (सोन्याचा किस) जमा होत होता. हाच सोन्याचा भुसा त्याने मंगळवारी (दि.10) एका छोट्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ती पिशवी त्याने आपल्या गुदद्वारामध्ये लपवली. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तो काम संपवून घरी जाण्यास निघाला होता. मात्र, यावेळी कंपनीच्या बाहेर जाताना लावण्यात आलेला मेटल डिटेक्टर वाजल्याने कंपनीतील सुरक्षा रक्षकांनी राजेशला बाजूला घेत त्याची तपासणी केली, मात्र त्याच्याजवळ काहीच सापडले नाही. त्यामुळे पुन्हा त्याची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करण्यात आली.
यावेळीही मेटल डिटेक्टर वाजल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी राजेशची कसून तपासणी केली. त्यानंतर राजेशने आपल्या गुदद्वारामध्ये 32.38 ग्रॅम वजनाचा तब्बल दोन लाख 12 हजार 800 रुपये किमतीचा सोन्याचा भुसा लपवल्याचे आढळून आले. त्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक सुरेंद्र जाधव यांनी राजेशला तुर्भे एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.